सांगली / प्रतिनिधी:
कोरोनाचा फटका सर्वांनाच बसला आहे. सध्याच्या काळात नाटक टिकण्यासाठी रसिकांसह सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे, असे आवाहन अभिनेते सागर कारंडे यांनी पत्रकार बैठकीत केले.
रसिकांच्या विशेष पसंतीस उतरलेला अभिनेता सागर कारंडे कोल्हापूर- सांगली-सातारामध्ये येत आहे इशारो इशारो में या नाटका सोबत. भावे नाट्यगृह सांगली येथे 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता हे नाटक होणार आहे. अबोल मनाचा बोलका आविष्कार असलेल्या या नाटकात विनोद आहे, रोमान्स आहे, भावनेला हात घालणारे प्रसंग आहेत. तरीही जरासं वेगळेपणही आहे. एक बोलका आणि एक अबोल या दोन जिवांच्या प्रेमाची ही एक गोष्ट आहे. इशारा इशारा मा या मूळ गुजराती नाटकाचा हा मराठी नाट्याविष्कार आहे.
अल्पावधीतच हे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरलेले आहे. सरगम क्रिएशन्स निर्मित सई इंटरटेनमेंट प्रस्तुत इशारो इशारो में या नाटकाची मूळ संकल्पना व दिग्दर्शन जय कापडीया यांचे आहे. तर याचे मूळ लेखक प्रयाग दवे असून मराठी मध्ये स्वप्नील जाधव यांनी रूपांतर केले आहे. सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी या नाटकाला संगीतबद्ध केले आहे. तर अजय पुजारे यांनी नेपथ्याची बाजू सांभाळलेली आहे. अजय कासुर्डे यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. सागर कारंडे सोबत उमेश जगताप, संजना हिंदुपूर, शशिकांत गंगावणे, अव्यान मेहता यांच्याही भूमिका यामध्ये आहेत.