प्रतिनिधी/ शिरोडा
कलाकार हा कलंदर असावा आपला कामधंदा संसार सांभाळून नाटय़कलेसाठी जीवन समर्पीत करणारा कलाकार आयुष्य यशस्वी होतो. नोकरी धंदा हा चरितार्थ सांभाळण्यासाठी तर नाटय़कलेचा जीवनाला आनंद देण्यासाठी असतो. आपल्या कलेतून इतराला आनंद देण्याऱया कलाकारांचा समाज नेहमीच आदर करतो असे प्रतिपादन गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी केले.
मराठी रंगभूमी दिनानिमित्त भटवाडी शिरोडा येथील श्री विश्वकर्मा सभागृहात येथील नटराज कला विकास मंडळाने शिरोडा गावातील जेष्ठरंगकर्मी दिपक खांडेपारकर यांचा सत्कार घडवून आणला होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या नात्याने वंसकर बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर छाया खांडेपारकर संस्थेचे लाला च्यारी, लक्ष्मण नाईक, सत्कार मूर्ती दिपक खांडेपारकर हे होते.
आपल्या भाषणात रमेश वंसकर पुढे म्हणाले की नटराज कला विकास मंडळ गेली चार दशके नाटय़ क्षेत्रात भरीव कार्य करत असताना सुट्टीच्या काळात मुलांसाठी बालनाटय़ संस्कार शिबिराचे आयोजन करत मुलांना नाटकसंबंधी गोडी लावण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. नाटय़ कर्मी दिपक खांडेपारकर यांच्या नाटय़ सेवेबद्दल वंसकर यांनी कौतुक केले. वंसकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री नटराज मुर्ती देऊन खांडेपारकर यांचा सत्कार करण्यात आला. खांडेपारकर यांचे सत्काराला उत्तर देणारे भाषण झाले. सौ. ललीता च्यारी यांनी छाया खांडेपारकर यांची खणा नारळाने आणि साडी देऊन ओटी भरली. लक्ष्मण नाईक यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले. लाला च्यारी व सुधा च्यारी यांनी पाहुण्याना पुष्पगुच्छ अर्पण करून सत्कार मुर्ती संबंधी गौरोद्गार काढले तर छाया खांडेपारकर यांनी आभार मानले.