– दोघांचीही 8 विरुद्ध 6 मतांनी निवड
– धर्मा चोडणकर यांचा पराभव
प्रतिनिधी / म्हापसा
अखेर नाटय़मय घडामोडीत बार्देश बझारचे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यात संस्थापक सदस्य ऍड. रमाकांत खलप यांना यश आले. बार्देश बझार को. ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी अखेर पूनम जयवंत नाईक यांची 8 विरुद्ध 6 मतांनी निवड झाली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी तथा या सोसायटीचे सुमारे 14 वर्षाच्या कालावधीत अध्यक्षपद भूषविलेले धर्मा चोडणकर यांचा भराभव केला. विशेष म्हणजे बार्देश बझारच्या चेअरमनपदावरून जयवंत नाईक यांना हटवून गुरुदास सावळ यांना अध्यक्षपद देण्यात आले होते मात्र नाटय़मय घडामोडीत काल जयवंत नाईक यांच्या मुलीलाच अध्यक्षपदावर विराजमान करण्यात आले. या नाटय़मय घडामोडीत मात्र धर्मा यांचे पुन्हा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर आरूढ होण्याचे स्वप्न मात्र भंगले.
अध्यक्षपद निवडणुकीसाठी ऍड. खलप यांच्या पॅनलमधून पूनम नाईक तर दुसऱया बाजूने धर्मा चोडणकर यांची तर उपाध्यक्ष निवडणुकीसाठी नारायण राठवड व शशिकांत कांदोळकर यांनी अर्ज दाखल केले होते. कुणीही आपले अर्ज मागे न घेतल्याने या पदासाठी निवडणूक झाली असता पूनम नाईक व नारायण राठवड अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी 8 विरुद्ध 6 मतांनी विजयी झाले.
माजी अध्यक्ष धर्मा चोडणकर यांनी आपला पॅनल आखला होता व अखेरपर्यंत आपणच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होईल असे स्पष्ट केले असतानाच नाटय़मय घडामोडीत जयवंत नाईक यांनी आपल्या मुलीला अध्यक्षपद देतात तर आपण तुमच्याबरोबर आहे असे आश्वासन ऍड. रमाकांत खलप यांच्याशी चर्चा करून दिल्यावर पूनम नाईक यांची अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आली. व या बाजारात सुमारे 22 वर्षाहून अधिक काळ संचालक म्हणून काम पाहणारे वरिष्ठ संचालक नारायण राठवड यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
सर्वांच्या सहकार्याने ही संस्था पुढे नेऊ- पूनम नाईक
अध्यक्षपद निवडणुकीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष पूनम नाईक म्हणाल्या की, सर्वांना बरोबर घेऊन व जी काही बार्देश बझाराची समस्या आहे ती सोडविण्यास आपला सदैव प्रयत्न असणार आहे. सर्वांच्या सहकार्याने ही संस्था पुढे नेण्यास आम्ही भर देऊ असे त्या म्हणाल्या.
उच्चप्रतीचे माफक दरात धान्य देण्यास प्रयत्नशील राहणार- राठवड
उपाध्यक्ष नारायण राठवड म्हणाले की, आपण बार्देश बझारात गेली 20 वर्षे काम करीत आहे. सर्वजण एकत्रित काम करतात. यंदा मात्र निवडणूक झाली ती व्हायला नको होती. सर्व संचालक सहकार्य करीत आहे व करणार आहे. बार्देश बझाराचे जे ध्येय आहे ते साध्य करण्यास आम्ही प्रयत्नशील राहणार. सर्व भागधारकांना व ग्राहकांना उच्च प्रतीचे वस्तू धान्य व माफक दरात मिळण्यास आम्ही प्रयत्न करणार आहोत.
बार्देश बझारचा विकास हाच एकमेव ध्येय– धर्मा चोडणकर
राजकारणात निवडणुकीत जय पराजय असतोच. लोकांना जे पाहिजे ते करण्यास मी प्रयत्न केला मात्र लोकशाही पद्धतीने हे सर्व काही एकमतांनी झाले व पूनम नाईक विजयी झाल्या. बार्देश बझारचा विकास हाच एक आमचा ध्येय होता. आपण मदत करण्यास सदैव तत्पर राहीन असे ते म्हणाले.
ऍड. रमाकांत खलप यांच्याकडून संचालक मंडळाचे अभिनंदन
संस्थापक सदस्य ऍड. रमाकांत खलप यांनी नवनिर्वाचित बार्देश बझारच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले. आम्ही सर्व वयोवृद्ध संचालक मंडळांनी आता ही संस्था युवा पिढीच्या हातात दिली आहे. युवा पिढीच्या सहकार्याने ही संस्था भरमसाठीकडे नेण्यास आम्ही सर्व एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
म्हापसा : नवनिर्वाचित अध्यक्ष पूनम नाईक व उपाध्यक्ष नारायण राठवड यांची निवड झाल्यावर निर्वाचन अधिकारी पांडुरंग नाईक पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना बाजूस सर्व संचालक मंडळ.