रक्कम भरण्यासाठी विलंब झाल्याने रात्री उशिरापर्यत लिलाव प्रक्रिया
प्रतिनिधी / बेळगाव
महात्मा फुले भाजी मार्केट मधील गाळयांचा लिलाव करण्यास विरोध करण्यात आला होता. त्यामुळे दुपारपर्यत कोणीच सहभाग घेतला नाही. मात्र नाटय़मय घडामोडीनंतर दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांनी लिलावात भाग घेण्यासाठी अनामत रक्कम भरण्यास प्रारंभ करण्यात आले. 59 गाळयांसाठी 80 नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे रात्री आठ वाजता लिलाव प्रक्रियेस सुरूवात करण्यात आल्याने रात्री 10 वाजेपर्यत बोली सुरू होती.
महात्मा फुले भाजी मार्केटची जागा वक्फ बोर्डची असल्याचा दावा करून लिलाव प्रक्रिया राबविण्यास आक्षेप घेण्यात आला. सदर प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका असल्याने लिलाव प्रक्रिया करू नये अशी मागणी करून गाळेधारक आणि नागरिकांनी ठिय्या आंदोलन छेडले होते. त्यामुळे दुपारपर्यत लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. पण लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी दुपारी एक वाजेपर्यत कोणीच अनामत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार सायंकाळपर्यत लिलाव प्रक्रियेचा वेळ वाढविण्यात आला. त्यामुळे मनपाचे अधिकारी ठाण मांडून होते. मात्र सकाळपासूनच्या नाटय़मय घडामोडीमुळे लिलाव प्रक्रिया होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर मनपाचे अधिकारी लिलावाच्या ठिकाणी आल्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी नागरिकांनी अनामत रक्कम भरण्यास प्रारंभ करण्यात आले. त्यामुळे पैसे भरण्यासाठी एकच गर्दी झाली. रात्री साडेसात वाजेपर्यत अर्ज व रक्कम भरण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती. त्यामुळे गाळे भाडे तत्वावर देण्यासाठी बोलीच्या प्रक्रियेला विलंब झाला. अखेर रात्री आठ वाजल्यापासून बोलीस प्रारंभ झाला. यावेळी नागरिकांनी पसंदीचा गाळा घेण्यासाठी आटापिटा चालविला होता. त्यामुळे बोलीवेळी चढाओढ लागली होती. त्यामुळे प्रवेशव्दारावरील गाळय़ांना बोलीची रक्कम वाढली. तर अन्य गाळय़ांसाठीदेखील नागरिकांनी बोली लावल्याने महात्मा फुले भाजी मार्केटमधील गाळे भाडेतत्वावर देण्याच्या प्रक्रियेला अखेर रात्रीचा मुहूर्त मिळाला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच गाळय़ासाठी रात्री उशिरापर्यत लिलावप्रक्रिया राबविण्यात आली आहे.
यावेळी महापालिकेचे शहर अभियंते गंगाधर, कायदा अधिकारी यु.डी. महांतशेट्टी, महसुल अधिकारी संतोष अनिशेट्टर, सामान्य प्रशासन उपायुक्त कंटी, नगरयोजनाअधिकारी बसवराज हिरेमठ आदीसह महसुल विभाग, आरोग्य विभाग, लेखा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.