कुख्यात गुंड विकास दुबे ठार : उज्जैनमधून उत्तर प्रदेशमध्ये आणताना चकमक : पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न फसला
कानपूर, लखनौ / वृत्तसंस्था
आठ पोलिसांची हत्या करून फरार झालेला कुविख्यात गुन्हेगार विकास दुबे शुक्रवारी सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. गुरुवारी विकास दुबे उज्जैनमध्ये पोलिसांच्या हाती लागला होता. मात्र, तेथून उत्तर प्रदेशमध्ये आणला जात असताना त्याने पोलिसांकडील रिव्हॉल्वर हिसकावून पोबारा करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला कंठस्नान घालण्यात आले. या संघर्षात तीन पोलीसही जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या नाटय़मय घडामोडीनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला असून चकमकीबद्दल अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. तसेच दुबेशी संबंधित राजकारणी आणि अन्य नामांकितांची नावे बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याचा आरोपही होत आहे.
कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱयांच्या हत्या प्रकरणात कुख्यात गुंड विकास दुबे याचा गेल्या आठवडय़ापासून शोध सुरू होता. गुरुवारी त्याला उज्जैनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत त्याचा खात्मा करण्यात आला. पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्यापासून 22 मिनिटापर्यंत त्याच्या हत्येचा थरार चालल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची टीम (एसटीएफ) गुरुवारी रात्रीच विकास दुबेला घेऊन उज्जैनहून कानपूरला निघाली होती. यावेळी एसटीएफच्या ताफ्यात स्कॉर्पिओ, सफारी आणि महिंद्रा अशी तीन वाहने होती. यापैकी पहाटे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास महिंद्रा गाडी रस्त्यावर उलटली. यामध्ये एसटीएफचा एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
अपघात, पलायन, गोळीबार, खात्मा
कानपूरमधील भौती परिसरात झालेल्या अपघाताचा गैरफायदा घेत विकास दुबेने पोलिसांच्या बंदुकीसह पळ काढल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले, मात्र दुबेने पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. साधारण 10 ते 15 मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्मयावर गोळय़ा लागल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. विकास दुबेने केलेल्या गोळीबारात विशेष पथकातील तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत विकास दुबे टोळीशी संबंधित पाच गुन्हेगारांना ठार मारले आहे.
चौकशीदरम्यान खळबळजनक माहिती
कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला गुरुवारी अटक करण्यात आली होती. यानंतर झालेल्या पोलीस चौकशीत विकास दुबेने खळबळजनक माहिती दिल्याचे समजते. पोलिसांच्या हत्येनंतर तो त्या पोलिसांचे मृतदेह जाळू इच्छित होता. पोलिसांचे मृतदेह जाळण्यासाठी एकत्रित करण्यात आले होते. त्यासाठी रॉकेलही आणले होते. मात्र, या घटनेनंतर काही वेळातच पोलिसांची अतिरिक्त फौज घटनास्थळी पोहोचल्यामुळे आपल्यासह सहकाऱयांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती विकास दुबेने चौकशीदरम्यान दिली.
एन्काऊंटरपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात याचिका
विकास दुबेला पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार करतील, अशी शक्मयता व्यक्त करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. विकास दुबेला सुरक्षा दिली जावी, अशी मागणीही याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात केली होती. सदर याचिका घनःश्याम उपाध्याय या वकिलाने दाखल केली आहे. पण सुनावणीसाठी ही याचिका येण्याआधीच विकास दुबेचा खात्मा करण्यात आल्याने या याचिकेचा आता कशा पद्धतीने विचार केला जाऊ शकतो, याबाबत औत्सुक्य आहे.
अटक ते खात्मा घटनाक्रम…
गुरुवार, 9 जुलै :
सकाळी 7.30 वा. : विकास दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी दाखल. ओळख पटल्याने फूलविक्रेता व सुरक्षारक्षकाने पोलिसांना माहिती दिली.
सकाळी 8.00 वा. : पोलीस मंदिराबाहेर दाखल. दर्शन घेऊन परतत असताना पोलिसांकडून ओळखपत्राबाबत चौकशी. यावेळी त्याची पोलिसांशीही हुज्जत.
सकाळी 8.30 वा. : पोलीस चौकशीला योग्य सहकार्य न केल्याने आणि अचूक ओळख पटल्याने पोलिसांकडून अटकेची कारवाई.
सायंकाळी 7.00 वा. : विकास दुबेला मध्यप्रदेशातून उत्तर प्रदेशला आणण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण. एसटीएफचे पथक दुबेला घेऊन कानपूरला रवाना.
शुक्रवार, 10 जुलै
पहाटे 6.15 वा. : एसटीएफच्या ताफ्यातील महिंद्रा गाडीला कानपूरनजीक भौती येथे अपघात.
पहाटे 6.18 वा. : अपघात व काळोखाचा गैरफायदा घेत विकास दुबेने पोलिसांकडील रिव्हॉल्वर हिसकावली. पळ काढण्याचा प्रयत्न.
पहाटे 6.19 वा. : पोलिसांचे दुबेला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन, मात्र दुबेकडून पोलिसांवर गोळीबार.
पहाटे 6.20 वा. : दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक, 10 ते 15 मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्मयावर गोळय़ा लागल्या.
पहाटे 6.40 वा. : गंभीर जखमी अवस्थेत विकास दुबेला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न. मात्र, उपचारापूर्वीच विकास दुबेचा मृत्यू.
राजकीय ‘गोळीबार…’
समाजवादी पार्टी (अखिलेश यादव)
समाजवादी पार्टीचे नेते व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी यावर ‘हा सरकार वाचवण्याचा प्रयत्न’ असल्याचे म्हटले आहे. ‘दरअसल ये कार नहीं पलटी है, राज खुलने से सरकार पलटने से बचाई गयी है’ असे ट्विट त्यांनी केले.
काँग्रेस (प्रियांका गांधी-वधेरा)
विकास दुबेच्या एन्काऊंटरमुळे एका गुन्हेगाराचा शेवट झाला; पण याच्याशी संबंधित अन्य गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱयांचे पुढे काय? असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वधेरा यांनी उपस्थित केला आहे.
बसपा (मायावती)
या एन्काऊंटरची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी व्हायला हवी. अशा गुन्हेगारी प्रकरणांचा तपास योग्यरितीने झाला तरच उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी प्रवृत्ती संपुष्टात येईल, असे बसप नेत्या मायावती म्हणाल्या.
शिवसेना (खासदार संजय राऊत) विकास दुबेचे एन्काऊंटर हा आपल्या सहकाऱयांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला सूड असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच पोलिसांचे खच्चीकरण करणारी वक्तव्ये केली जाऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.