वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता मुष्टीयोद्धा अखिल कुमार याचा नाडाच्या शिस्तपालन समितीमध्ये फेरसमावेश करण्यात आला आहे. हरियाणा पोलीस खात्यामध्ये अखिल कुमार गुरूग्राम येथे एसीपी पदावर कार्यरत आहे.
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सीच्या (नाडा) शिस्तपालन समितीमध्ये 2017 ते 2019 या कालावधीत अखिल कुमारचा समावेश करण्यात आला होता. अखिल कुमारला या शिस्तपालन समितीमध्ये मुदतवाढ दिली नसून त्याचा या समितीमध्ये फेर समावेश करण्यात आल्याची माहिती नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल यांनी दिली आहे. भारतीय मुष्टीयुद्ध क्षेत्रामध्ये अर्जुन पुरस्कार विजेता अखिल कुमार याचे नाव आघाडीवर घेतले जाते. 2017 आणि 2019 या कालावधीत शासनातर्फे अखिल कुमारची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.