ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 2020 या वर्षातील जवळपास सर्वच सण अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले. त्याप्रमाणेच नाताळ हा सण देखील साजरा करण्याचे आवाहन ठाकरे सरकारने जनतेला केले आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व ख्रिस्त धर्मीयांना यंदाचा नाताळ सण हा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावले उचलली जात आहेत.
- नाताळ साजरा करण्यासाठीचे नियम खालीलप्रमाणे…
- स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये 50हून जास्त जणांचा समावेश नसावा.
- कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.
- सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच चर्च परिसराचे नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणे अनिवार्य.
- चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक.
- चर्चमध्ये प्रभू येशुचे स्तुतीगीत गाण्यासाठी 10हून जास्त व्यक्तींचा सहभाग नसावा.
- स्तुतीगीत गातेवेळी वापरण्यात येणारे माइक स्वच्छ असण्याबाबत काळजी घ्यावी.
- 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांखाली लहान मुलांनी चर्चमध्ये आणि घराबाहेर जाणे टाळावे. याऐवजी यंदा त्यांनी घरातच हा सण साजरा करावा.
- कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणारे देखावे, आतिषबाजीचे आयोजन करु नये.
- 31 डिसेंबरला आभारप्रदर्शनासाठीचे मास आयोजित करतेवेळी वेळेचे निर्बंध पाळत मध्यरात्रीऐवजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास याचे आयोजन करावे.
- नाताळ सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलीचे पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा असंच जाहीर आवाहन करण्यात येत आहे.