प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगरनजीक शनिवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास एर्टीका कार व झेन इस्टोलो यांच्यात झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
प्रवीण सुतार (24), विमल सुरेश सुतार (64), महेश किसन सुतार (तिघेही रा. महाड) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने उपचारार्थ कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. एर्टीका कारचालक मन्सूर लियाकत बामणे हे आपल्या ताब्यातील कार घेवून दाभोळ येथून मुंबईच्या दिशेने जात होते. कारच्या पाठीमागून मुंबईच्या दिशेने जाणाऱया इस्टोलो कारचालक महेश किसन सुतार यांचा कारवरील ताबा सुटल्याने एर्टीका कारवर जावून आदळून अपघात घडला.
अपघाताचे वृत्त कळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बोडकर व सहकाऱयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य केले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.