मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे जोहॅरी विंडो ही चार तावदानांची खिडकी म्हणता येईल, आपल्या स्व-जाणिवेचे हे चार भाग आहेत. 1. प्रकट-स्व (Open self) 2. अंध-स्व (Blind self) 3. खाजगी-स्व (Private-self) 4. अज्ञात-स्व (Unknown self) अशी कल्पना करा की खिडकीची एक बाजू, तावदानाची एक बाजू जर धुळीने माखलेली आहे किंवा अर्धपारदर्शक आहे तर आपण पलीकडचे नीट पाहू शकू का? अगदी तसेच या जोहॅरी विंडोचे तावदान एक बाजू दर्शी असेल तर दुसऱया व्यक्तीची मते, माहिती, भावना स्पष्टपणे कळणार नाहीत. परस्पर संबंधामध्ये अडथळा किंवा गोंधळ निर्माण होईल. जर हेच तावदान टू वे ग्लास असेल तर दोन्ही बाजूंची देवाणघेवाण मुक्त आणि खुलेपणाने सुरू राहील.
जोहॅरी विंडोच्या चार भागांची माहिती आपण मागील लेखात घेतली आहेच. प्रकट स्वचे क्षेत्र विस्तारित करण्यासाठी आणि इतर क्षेत्रांची व्याप्ती कमी करण्यासाठी पुनर्भरण अर्थातच फीडबॅक आणि स्व-प्रकटन (सेल्फ डिस्क्लोजर) हे दोन मार्ग या प्रारुपात सांगितले आहेत.
फीडबॅक म्हणजे एखादी वस्तू, व्यक्ती, प्रसंग इत्यादीबद्दलचे माघारी येणारे वृत्त वा त्याच्याबद्दल समोरच्याला मुद्दाम दिली जाणारी माहिती असे म्हणता येईल. पहा हं, एखादा सेल्समन दुकानदाराला अमुक एक गोष्ट दिली आहे ना त्याचा फीडबॅक अवश्य द्या..दोन आठवडय़ांनी येतो हं, असे सहज सांगताना दिसतो. दुकानदार ग्राहकाला अमुक एक वस्तू वापरून पहा..सांगा हं कशी वाटली, असे सांगतो. हे सांगताना त्या व्यक्तीने जो असेल तो फीडबॅक देणे अपेक्षित असते.
आपला पाल्य कशी प्रगती करतो आहे, त्यामध्ये काय सुधारणा आवश्यक आहे हा फीडबॅक पालक शिक्षकांकडून घेऊन तशा दृष्टीने मुलाच्या प्रगतीसाठी काय करता येईल हे पाहतात, सुधारणेसाठी आवश्यक गोष्टी कशा पद्धतीने कर हे सांगतात, तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेतात.
प्रत्येक क्षेत्रात, बहुतांश सर्वांनाच फीडबॅक हवा असतो. औद्योगिक क्षेत्रात तर हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. परंतु फीडबॅक देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याचा उपयोग हा टीकात्मक किंवा केवळ दोष दाखविण्याच्या हेतूने नसावा.
अगदी साधे उदाहरण पाहुया. नव्यानेच लग्न झालेली मालन. काहीतरी स्पेशल करावे म्हणून तिने हौशीने गुलाबजाम केले. दिरांनी एक गुलाबजाम तोंडात टाकला आणि ‘छॅ…हा गुलाबजाम आहे की मेण.. ना चव ना ढव.. शॅ.. अगदीच बकवास..अगदी फालतु.’ अशी शेरेबाजी करत नाराजी व्यक्त केली. मालन रडवेली झाली. तिच्या सासुबाईंनी मात्र तिला सांभाळून घेत म्हटले, ‘अगं, मालन हे असं होतं..तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको..अगं मी नवीन असताना तर मी केलेला शिरा असा काही बिघडला होता की काही विचारू नको..’ असे म्हणत त्यावेळचा एक गमतीदार किस्सा त्यांनी मालनला सांगितला. ‘अगं सुरुवातीला अंदाज नसतो आपल्याला..सरावाने आपोआप जमतं बघ! आपण दोघी मिळून करुया स्वयंपाक.. हळूहळू बघ कशी तयार होशील.’ मालन अगदी मनापासून हसली आणि तिने मानही डोलावली. सासुबाईंनी तिला छान समजावून सांगितले. मालन रिलॅक्स झाली परंतु दिराच्या शेरेबाजीमुळे त्यांच्याविषयी तिच्या मनात नकळत अढी निर्माण झाली आणि सासूबाईंबद्दल मात्र जवळीक वाटू लागली.
आपण देत असलेला फीडबॅक परस्पर संबंध बिघडवणारा, एखाद्या गोष्टीची चिरफाड करणारा नसावा तर काय बदल अपेक्षित आहे हे अगदी योग्य पद्धतीने व्यक्त होत सांगायला हवे. फीडबॅकचा योग्य प्रकारे उपयोग करून अंध स्वचे क्षेत्र कमी करून प्रकट स्वचे क्षेत्र वाढवता येते. आपल्यातील दोष, उणिवा कमी करून परस्पर संबंधात खुलेपणा आणता येतो. मात्र तो देताना योग्यवेळी दिला जावा आणि समोरची व्यक्ती स्वीकारण्याच्या मनःस्थितीत असताना द्यावा.
स्व प्रकटन (Self -disclouser)
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे खाजगी अथवा सुप्त स्व असलेली व्यक्ती स्वःबद्दल बोलत नाही. इतरांना आपल्याबद्दल माहिती आहे हे गृहीत धरूनच चालत असतात. ‘अरे, मला वाटले तुम्हाला माहिती असेल’ हे त्यांचे परवलीचे वाक्मय असते. पण यामुळे दुसऱयाची मात्र गडबड उडते. उदा. समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे येणार आहे म्हणून आपण छान पुरणपोळय़ा करून ठेवल्या. जेवायला बसताना मात्र.. ‘अरे, मी गोड बिल्कुलच खात नाही, मला शुगर आहे.’
‘अरे देवा..अहो मी विचारलं तेव्हा सांगायचं तरी.. तुम्ही म्हणालात काहीही करा वहिनी सगळं आवडतं.’
‘अहो, मला शुगर आहे तुम्हाला माहीत नाही? मला वाटले तुम्हाला माहिती असेल..अलीकडे फार वाढलेली. त्यामुळे गोड तसं पूर्णपणे बंदच केलंय.’ झाली गडबड आणि तारांबळ…आयत्यावेळी त्या गृहिणीची कसरत सुरू होते. आयत्यावेळी जर ते सांगितले तर मात्र मग गडबड होते. सुप्त स्व वाल्यांचे असे असंख्य किस्से सांगता येतील. अशा स्वभावाने गोंधळ तर होतोच परंतु गैरसमजही निर्माण होतात. काही वेळा नात्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. आपल्या आवडी निवडी, छंद, कौटुंबिक, शैक्षणिक माहिती, आपले कलागुण याविषयी समोरच्या व्यक्तीला योग्य पद्धतीने व्यक्त होत माहिती दिलेली असली तर गडबड, गोंधळ, गैरसमज, विरस होणे या गोष्टी घडण्याची शक्मयता फार कमी उरते.
मात्र स्वतःबद्दलची माहिती केव्हा, कुठे, कशी, किती द्यावी याबाबत मात्र आपण भान राखायला हवे. नाहीतर वेगळे गोंधळ होऊ शकतात. उदा. शामरावांना बोलायची खूप आवड. दारावरती आलेल्या विपेत्यासोबत शामराव अगदी भरभरून बोलले. बोलण्याच्या ओघात आपण कसे श्रीमंत आहोत परंतु आम्ही दोघे कसे एकटेच राहतो. कंटाळा आला म्हणून आठ दिवस आम्ही कसे बाहेर जाणार आहोत हेही सांगितले. झाले.., शामराव फिरायला बाहेर गेले खरे परंतु आले तेव्हा घरात चोरी झाली होती. आपण माहिती सांगितल्यामुळे असे झाले का, ही खंत मात्र शामरावांची सोबत पुढे बराच काळ करत राहिली. काही अत्यंत खाजगी गोष्टी उत्साहाने सांगणे गोत्यात आणू शकते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो हे लक्षात घेत फीडबॅक आणि स्व-प्रकटन योग्य प्रमाणात करायला हवे. आपले इतरांसोबतचे नातेसंबंध फीडबॅक आणि स्वप्रकटन योग्य प्रमाणात झाल्यास दृढ होतील हे मात्र निश्चित!
ऍड. सुमेधा देसाई