रस्ता बंद असल्याने पर्यायी मार्गांचा वापर
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनच्या काळातही स्मार्ट सिटीचे काम धिम्यागतीने सुरू आहे. शहापूरच्या नाथ पै सर्कल येथील रस्त्यावर पेव्हर्स बसविण्याचे काम मागील दोन दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. वडगाव-शहापूर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतर आता सर्कलच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु धिम्यागतीने काम सुरू असल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, गटारींचे बांधकाम, पेव्हर्स बसविण्याचे काम करण्यात येत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे कामगार कमी असल्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांना बेक लागला होता. आता काही प्रमाणात पुन्हा एकदा कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नाथ पै चौक येथील काम मागील अनेक दिवसांपासून ठप्प होते. अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे.
रस्ता बंद असल्याने गैरसोय
वडगाव-शहापूर मार्गांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतर पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गोवावेस सर्कलप्रमाणेच येथेही पेव्हर्स बसविण्यात येत आहेत. परंतु वडगाव, शहापूर, गोवावेस व खासबागकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाथ पै सर्कलपर्यंत येवून पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.