सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीनजीक भीमाशंकर येथे मालमोटार आणि टँकर यांची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात दोन्ही वाहनचालकांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा प्रवासी जखमी झाले. अपघातस्थळी नादुरूस्त रस्त्यामुळे हा अपघात झाला असून याप्रकरणी संबंधित दोन्ही रस्ता ठेकेदारांसह मृत वाहनचालकांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
उजनी धरणासमोर भीमानगरच्या पुलाजवळ चौपदरी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या रो़डवर एकेरी वाहतूक सुरू आहे. परंतु रस्ता दुरूस्त करताना तेथे कोणत्याही प्रकारच्या सावधानतेचा किंवा दिशा दर्शक फलक लावलेला नाही. तसेच त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्याने येथे योग्य नियंत्रण करणारी यंत्रणा देखील सक्रिय दिसत नाही. त्यातूनच दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन छोट्या-मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळते.
शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मालवाहक व टँकरचा अपघात झाला. तांदूळ वाहतूक करीत सोलापूरहून पुण्याकडे निघालेला मालवाहक टेंभुर्णीच्या पुढे भीमानगर येथे नादुरूस्त असलेला रस्ता ओलांडताना समोरून-पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या टँकरची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनचालकांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला.