महादेव गावस या दूध व्यवसाईकाचे सत्तर हजाराचे नुकसान : कारवाईची मागणी
वार्ताहर / रेवोडा
नादोडा येथील महादेव धने गावस यांची चरावयास सोडलेल्या म्हशीवर कोणीतरी अज्ञाताने बंदुकीची गोळी झाडल्याने गावस यांची गाभण म्हैस जागीच ठार झाली. त्यामुळे या गरीब दुध व्यवसाय करणाऱया शेतकऱयाचे अंदाजे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दोन दिवसापूर्वी चरावयास सोडलेली म्हैस घरी न आल्याने म्हशीचा सगळीकडे शोध घेतला. मात्र म्हैस कुठेच सापडली नाही. काल एक व्यक्ती बिब्याचो आख येथे शेताजवळील रानातील झाडीत आंबे शोधायला गेला असता म्हैस मरून पडलेली दिसली, त्या व्यक्तीने महादेव गावस याला आपली म्हैस मरून पडल्याचे सांगितले. तेथे जाऊन पाहिलग्नी त्यावेळी म्हशीवर कोणीतरी बंदुकीच्या दोन गोळय़ा झाडल्याचे दिसले. याविषयीची माहिती म्हापसा पोलिसांना व पशु संवर्धन खात्याच्या अधिकाऱयांना देण्यात आली असता त्यांनी येऊन पाहणी केली.
या भागात गवा रेडय़ाकडून हैदोस घालून येथील शेतकऱयांचे बरेच नुकसान केले. शेतकऱयांच्या बागायतीची नुकसानी केली. याविषयी शेतकऱयांनी शेतकी खाते व इतर सरकारी खात्याकडे गव्या रेडय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती यावर सरकारकडून काहीच उपाय योजना झाली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या एखाद्याने चुकून गवारेडा समजून झाडीत चरत असलेल्या म्हशीवर गोळी झाडली असल्याचा अंदाज काही जणांकडून व्यक्त करण्यात येत असला तरी हे कृत्य करणाऱयावर कारवाई करावी व आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महादेव गावस यांनी केली आहे.