प्रतिनिधी / सोलापूर
नान्नज (ता. उत्तर सोलापूर)-आठवीतील अमीर अल्ताफ मुजावर (वय 14) याचा अरबाज आयुब शेख (वय 22) याने रुमालाने गळा आवळून दगडाने खून केला. या खुनाबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमीरने अरबाजकडून 1 हजार 500 रुपये घेतले होते. ते पैसे परत मागण्यासाठी अरबाज अमीरला घेऊन गेला होता. याच पैशाने बिचाऱया 14 वर्षांच्या अमीरचा घात केला आहे.
अरबाज शनिवारी दुपारी अमीरला घरून बाहेर घेऊन गेला होता. सायंकाळपर्यंत अमीर घरी न आल्याने त्याला फोन केला, असता मोबाईल बंद लागला. रात्री नऊच्या दरम्यान आरोपी अरबाजला विचारले असता, त्याने अमीरला मार्डीत मित्राकडे असल्याचे सांगितले. दरम्यान अमीरच्या आई-वडिलांना अरबाजचा संशय आल्याने ते उत्तर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले. पोलिसांनी अरबाजकडे चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली.
दरम्यान पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच नान्नज-मार्डी रस्त्यावरील बिचडू यांच्या शेताशेजारी नेऊन अमीरला दारू पाजली व स्वतः ही पिला. त्यानंतर त्याचा गळा दाबला. व डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली आरोपीने दिली. घटनास्थळी अमीरच्या तोंड व नाकातून रक्तस्राव झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनास्थळी दोन दारूच्या बाटल्या व रिकामे ग्लास आढळून आले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून मोबाईल जप्त केला असून, आरोपी अरबाज शेख याच्याविरोधात उत्तर पोलीस ठाण्यात 302 व 364 गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप करीत आहेत.
वडिलांचा बेकरी व्यवसाय
मृत अमीरच्या पश्चात वडील, आई व एक भाऊ असून, भाऊ सोलापुरात शिक्षण घेत आहे. त्याच्या वडिलांची नान्नज येथे बेकरी आहे. तो हिंदुस्थानी इंग्लिश मिडीअम कॉन्वेंट स्कूलमध्ये नान्नज येथेच शिक्षण घेत होता.
मोबाईल न दिल्याने खून
आरोपीने अमीरला पैशासाठी तगादा लावला होता. तो देण्यास असमर्थ होता. घटनेदिवशी पैसे दे किंवा मोबाईल दे, असे म्हणत त्याला घरातून बाहेर घेऊन केला. त्याला दारु पाजली. नशेतही अमीरने मोबाईल व पैसे देण्यास नकार दिल्याने गळा आवळून व दगड घालून खून केल्याची शक्यता असावी, अशी घटनास्थळी चर्चा होती.