रोम
ड्राईस मर्टेन्सने निर्णायक गोल नोंदवून नापोली संघाला इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. नापोलीने दोन टप्प्यांच्या उपांत्य लढतीत इंटर मिलानवर 2-1 असा विजय मिळविला. मर्टेन्स हा आता क्लबचा सर्वकालीन सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू बनला आहे.
बुधवारी होणाऱया अंतिम लढतीत नापोलीचा युवेंटसविरुद्ध मुकाबला होणार आहे. बेल्जियमचा फॉरवर्ड असणाऱया मर्टेन्सने मध्यंतराच्या चार मिनिटे आधी गोल नोंदवला. त्याचा हा एकंदर 122 वा गोल होता. या गोलमुळे नापोली-मिलान यांची 1-1 अशी बरोबरी झाली. पण गेल्या फेब्रुवारीत झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात नापोलीने 1-0 असा विजय मिळविला होता. त्याच्या आधारावर नापोलीने 2-1 असा विजय मिळवित अंतिम फेरी गाठली.
येथील सामन्यात दुसऱयाच मिनिटाला ख्रिस्तियन एरिकसनने कॉर्नरवर गोल नोंदवून मिलानला एकंदर बरोबरी साधून दिली होती. पूर्वार्धात त्यांनीच सामन्यावर वर्चस्व राखले होते. पण मर्टेन्सने अतिशय चपळतेने प्रतिआक्रमण करीत गोल नोंदवून नापोलीचा विजयही निश्चित केला. 33 वर्षीय मर्टेन्सने मॅरेक हॅमसिकचा सर्वाधिक गोलांचा विक्रम मागे टाकला.