हिमालय हा बहुगुणी औषधी वनस्पतींचे आगर आहे. तथापि मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड आणि इतर कारणांमुळे अनेक नाजूक प्रकृतीच्या औषधी वनस्पती झपाटय़ाने लुप्त होत आहेत. या वनस्पतींना वाचविणे आणि त्यांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. एखादी वनस्पती एकदा नाहीशी झाली ती पुन्हा ती अस्तित्वात येऊ शकत नाही. यामुळे संशोधक चिंतीत आहेत.
अशा नामशेष होत चाललेल्या वनस्पतींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची माहिती व गुणधर्म यांचा अभ्यास करण्यासाठी देशात प्रथमच हायपर स्पेक्ट्रल डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यात आली आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने हे कार्य केले आहे. या लायब्ररीत असणाऱया साधनांच्या माध्यमातून तसेच संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या औषधी वनस्पतींचा शोध घेणे शक्य होणार आहे. ही लायब्ररी तयार करण्यासाठी तीन वर्षे परिश्रम करावे लागले आहेत. स्पेक्ट्रल टूल ऑफ हिमालयन रेअर इन्वेझिव्ह मेडिसिनल अँड इकॉनॉमिकल प्लँट स्पेसीस (श्राईम) या नावाने ती ओळखली जाते. बनारस हिंदू विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रशांतकुमार श्रीवास्तव यांनी या लायब्ररीचा विकास केला असून अशाप्रकारची ती भारतातील प्रथमच संस्था आहे. दुर्मिळ वनस्पतींचे स्थान, त्यांच्या उपलब्धतेचे प्रमाण, त्यांचे औषधी गुणधर्म, आर्थिक लाभासाठी उपयोग इत्यादींची माहिती या संस्थेत मिळते.