मालोजी पाटील/ गोकुळ शिरगाव वार्ताहर
जागतिक स्तरावरील नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये कणेरी ता. करवीर येथील व न्यू कॉलेज कोल्हापूर येथे कार्यरत असणाऱ्या प्रा. डॉ. प्रशांत बापुसो पाटील यांनी स्थान मिळवले आहे. ‘फिजिक्स, नॅचरल सायन्सेस’ (Physics/ Natural Sciences) या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची यादी जाहीर झाली आहे. ही यादी तयार करताना गेल्या पाच वर्षातील शास्त्रज्ञांचे संशोधन पेपर, एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स आदी निकष वापरले गेले. जागतिक स्तरावर दरवर्षी विविध नामांकित संस्थांमार्फत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे मानांकन ठरविले जाते. शैक्षणिक वर्षे २०२१ साठी ए.डी. सायंटिफिक इंडेक्सतर्फे (A D Scientific Index) जागतिक स्तरावरील १६७ देशामधील दहा हजारावर विद्यापीठातील साधारण पाच लाख शास्त्रज्ञांची यादी प्रसिद्ध केली आहे.
डॉ. पाटील मुळचे कणेरी (ता. करवीर) चे रहिवाशी आहेत. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. एमएसस्सी नंतर त्यांनी नेट (जेआरएफ), गेट, सेट, जेस्ट या परीक्षेत यश संपादन केले आहे . तसेच भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांच्या प्रवेश परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी आयआयटी, बाँम्बेमधून पीएच.डी. संपादित केली. तेथे त्यांनी कॉम्प्युटर हार्ड डिस्कमधील रिड हेड मटेरियल या विषयावर संशोधन केले. पीएच.डी. नंतर दक्षिण कोरियातील सेंटर फॉर नॅनो बायो इंजिनिअरिंग अँण्ड स्पिन्ट्रॉनिक्समध्ये पोस्ट डॉक्टरल रिसर्च केला आहे. सध्या न्यू कॉलेजमध्ये त्यांचे संशोधन मुख्यत्वे
बायोसेन्सर आणि मॅग्नेटिक नॅनोपार्टीकल्स (Biosensor, Magnetic Nanoparticles) या क्षेत्रात चालू आहे. डॉ. पाटील यांना या संशोधनासाठी भारत सरकारच्या सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी विभागाकडून ३५ लाखांचा संशोधन प्रकल्प मंजूर आहे. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संस्थेचे चेअरमन श्री. के. जी. पाटील आणी पदाधिकारी तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांचे पाठबळ आणि प्राचार्यांचा मोलाच्या सहकार्यामुळे संशोधनाच्या माध्यमातून कॉलेजचे आणी कणेरीचे नाव जागतिक स्तरावर प्रसिद्धीस आणले. प्रा. पाटील यांचे अभिनंदन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा.डॉ. पी ऐस पाटील, पदार्थविज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ. के वाय राजपुरे आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गांनी केले.
न्यू कॉलेज तर्फे रेकग्निशन ऑफ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन रिसर्च हा अवॉर्ड प्राप्त. डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार पीएच.डी.चे विद्यार्थी संशोधन करत आहेत. या विद्यार्थ्यांचे मॅग्नेटिक मटेरियल फॉर डेटा स्टोरेज, हेवी मेटल आयन रिमुव्हल फ्रॉम वेस्ट वॉटर व डायग्नोसिस अँण्ड थेरपी ऑफ कॅन्सर यावर संशोधन सुरू आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्स विभातील १५ विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे नामांकित संशोधन पत्रिकेत ४० शोधनिबंध व दोन बुक चॅप्टर प्रसिद्ध आहेत.