अबु धाबी / वृत्तसंस्था
यंदा पदार्पण करत असलेल्या नामिबियाने आपल्यापेक्षा सरस मानांकित नेदरलँड्सला 6 गडी राखून पराभूत करत आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत धक्कादायक निकाल नोंदवला. अनुभवी डेव्हिड विएझेच्या 40 चेंडूतील 66 धावांच्या नाबाद खेळीमुळे नामिबियाने 165 धावांचे आव्हान 1 षटक बाकी ठेवत पूर्ण केले. कर्णधार गेरहार्ड इरास्मूसने 22 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, सलामीवीर मॅक्स ओडोडने (70) सलग दुसरे अर्धशतक साजरे केले. शिवाय, कॉलिन ऍकरमनसमवेत 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. कॉलिनने 35 धावा जमवल्या. या सामन्यात नेदरलँड्सने 20 षटकात 4 बाद 164 धावा जमवल्या. प्रत्युत्तरात नामिबियाने 19 षटकात 4 बाद 166 धावांसह दमदार विजय संपादन केला.
यापूर्वी आयर्लंडविरुद्ध मागील लढतीत 51 धावा फटकावणाऱया मॅक्सने या लढतीत देखील गोलंदाजांवर तुटून पडण्यात अजिबात कसर सोडली नाही. त्याच्या 57 चेंडूतील खेळीत 6 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला.
संक्षिप्त धावफलक
नेदरलँड्स ः 20 षटकात 4 बाद 164 (मॅक्स ओडोड 70, कॉलिन ऍकरमन 35. फ्रायलिंक 2-36). नामिबिया ः 19 षटकात 4 बाद 166 (डेव्हिड व्हिएझे नाबाद 66, गेरहार्ड एरास्मूस 32. पीटर सीलार 1-8).