ऑनलाईन टीम / अबूजा :
नायजेरियात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी 110 शेतमजुरांची निघृण हत्या केली. नायजेरियाच्या उत्तर-पूर्व भागातील मैदुगुरी शहरात शनिवारी ही घटना घडली असून, यापूर्वी मृतांची संख्या 43 सांगण्यात आली होती. आता ही संख्या 110 पर्यंत पोहचली आहे. नायजेरियातील संयुक्त राष्ट्राच्या समन्वयक एडवर्ड कोलन यांनी ही माहिती दिली आहे.
दहशतवाद्यांनी मारलेले सर्व शेतमजूर उत्तर पश्चिम नायजेरियाच्या सोकोतो राज्यातील होते. हे सर्वजण कामाच्या शोधात मैदुगुरी शहरात आले होते. शेतात काम करत असताना दुचाकींवर आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी या सर्वांना रस्सीने बांधले. त्यानंतर जबरी मारहाण करत त्यांचे गळे कापले. या हल्ल्यात आतापर्यंत 110 मजुरांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी आहेत. या गावातील काही महिलांचे अपहरण झाल्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
बोको हरामच्या दहशतवाद्यांनी या दशकात जवळपास 30 हजार नागरिकांची हत्या केली असून, या वर्षात शेतमजुरांवर झालेला हा सर्वात हिंसक हल्ला आहे, असे कोलन यांनी म्हटले आहे. तसेच दोषींना या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.