तालुक्यातील दुसरी घटना, ग्रामदक्षता कमिटीची तक्रार
चिपळूण / वार्ताहर
तालुक्यातील कोंढे येथे रेशन दुकानातील धान्य अपहार समोर आला असतानाच नारदखेरकी येथेही धान्य वाटपात घोळ झाल्याची तक्रार झाल्याने तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. ग्रामदक्षता समितीने चिपळूण तालुका पुरवठा विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, अधिकाऱयांमार्फंत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून रेशन दुकानावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्याबरोबरच मोफत प्रतिमाणसी 5 किलो तांदूळ वितरित करण्याचा निर्णय घेतला. यानुसार रेशन दुकानांवर धान्य उपलब्ध करून देण्यात आले. काही दिवसांपूर्वी नारदखेरकी येथील रेशन दुकानात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वाटप सुरू करण्यात आले होते. यावेळी ग्राम दक्षता समितीचे पदाधिकारी, सदस्यही तेथे उपस्थितीत होते.
धान्य वाटप करताना रेशन दुकानदार काही शिधापत्रिकाधारकांना कमी धान्य देत असल्याचे समितीला आढळून आले. धान्य वाटपात घोळ होत असल्याचे निदर्शनास येताच समितीने त्याबाबतची तक्रार चिपळूण पुरवठा विभागाकडे केली. त्या तक्रारीची दखल घेत तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी वाडकर यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य राघो आंबवकर यांनी दिली. यावेळी सरपंच तनुजा साळवी, माजी सरपंच शांताराम बांद्रे, पांडुरंग बांद्रे, सीताराम बांद्रे, रघुनाथ चाळके आदीही उपस्थित होते.
चौकशीचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱयांकडे
याबाबत तालुका पुरवठा निरीक्षक मनोज पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्राम दक्षता समितीच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आले असून याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱयांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांच्या आदेशानंतरच पुढील कारवाई केली जाईल.