कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्यातील काँग्रेसवर 25 आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. तसे पत्रक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आमदारांनी पाठवले आहे. तसेच सोनिया गांधी यांनी तीन ते चार एप्रिल रोजी वेळ द्यावी अशी मागणीही या पत्रकात करण्यात आली आहे. त्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदारांच्या सह्या आहेत. मात्र कोणताही आमदार नाराज नसल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले आहे. तर ते ट्रेनिंगसाठी दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्रकावर या सह्या असल्याचे समोर आले आहे.
‘या’ आमदारांचा पत्रात समवेश
आमदार संग्राम थोपटे, विकास ठाकरे प्रणिती शिंदे, संजय जगताप, कुणाल पाटील, अमित झनक, पी. एन. पाटील, हिरामण खोसकर, आमीन पटेल, विक्रमसिंह सावंत सासाराम कोराटे, बळवंत वानखेडे, , लहू कानडे, शिरीष चौधरी, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, शिरीष कुमार नाईक, कैलास गोरंट्याल, राजेश ऐकाडे, सुलभा खोडके, सुभाष धोटे आणि राजू आवळे यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांचे नाराजी नाट्य सुरूच आहे. शिवसेनेचे २५ आमदार नाराज असल्याचे बोलले जात असताना आता काँग्रेचे २५ आमदार नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. नाराज असलेल्या आमदारांचं स्वारस्थ्य भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे. मात्र हा आरोप खोडून काढत त्यांनी हे आमदार ट्रेनिंग साठी जात असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या जवळपास 25 आमदारांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहीत भेटीसाठी वेळ मागितला आहे. हे आमदार सरकरमधील काँग्रेसच्याच मंत्र्यांवर नाराज असल्याच्या राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार संकटात आहे की राज्यात काँग्रेसच संकटात आहे? असा सवालही राजकारणात उपस्थित केला जाऊ लागला आहे.
पत्रावर पी. एन. पाटलांची सही
या संपूर्ण प्रकारामुळे काँग्रेस आमदरांची अंतर्गत धुसफूस पुन्हा बाहेर आल्याची चर्चा आहे. सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रावर २० आमदारांच्या सह्या असुन कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याचे आमदार पी. एन. पाटील यांची सही असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, करवीरचे आमदार व जिल्ह्याचे नेते पी. एन. पाटील यांची सही पत्रावर असल्याने पी. एन. पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. पी. एन. पाटील यांनी याआधीही सोनिया गांधींची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पी. एन. पाटील हे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष असणार आहे.