दोडामार्ग – वार्ताहर-
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व खासदार नारायण राणे यांचा आज सायंकाळी दिल्लीत शपथ विधी होताच दोडामार्ग बाजारपेठेत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत व मिठाई वाटत एकच आनंदोत्सव साजरा केला. दोडामार्गचे भाग्यविधाते… नारायण राणे आगे बढो हम आपके साथ है अशा घोषणांनी संपूर्ण बाजारपेठ दणाणली.
खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रिपद मिळणार असल्याच्या बातम्या गेल्या दोन तीन दिवसांपासून सर्व वृत्तवाहिन्या, सोशल मीडियावर झळकत होत्या. खा. राणे काल परवा सिंधुदुर्ग दोऱ्यावर आले असता त्यांना दिल्लीहून तातडीने बोलावणे येताच गोवा मार्गे ते विमानाने सपत्नीक दिल्लीला रवाना झाले होते. आज सायंकाळी त्यांचा दिल्लीत शपथविधी होताच दोडामार्गात भाजपचे पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी फटाके फोडत व मिठाई वाटत एकच जल्लोष केला.
दोडामार्ग तालुक्याचे निर्माते खासदार नारायण राणे हेच आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते आहेत अशा प्रतिक्रिया यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, युवमोर्चा तालुकाध्यक्ष दीपक गवस, प्रवीण आरोंदेकर, शाम चांदेलकर, बाळा कोरगावकर, फोंडू हडीकर, शाणी बोर्डेकर, राजू निबांळकर, रंगनाथ गवस, संजय विर्नोडकर, देवा शेटकर, सुधीर पनवेलकर, प्रकाश जाधव, अजित कुडतरकर, अमित प्रसादी आदी उपस्थित होते.