मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना बजावलं समन्स
ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणेंनी वक्तव्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. मंत्री राणे यांनी केलेल्या खळबळजनक विधानांमुळे हा वादंग निर्माण झाला आहे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना समन्स बजावलं आहे.
दिशाच्या मृ्त्यूबाबत नारायण राणे आणि नितेश राणे यांनी आरोप केले होते. यारोपानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच आपल्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करू नका अशी दिशांच्या आई-वडिलांनी विनंती केली होती. तरीही राणे पिता-पुत्र दिशाच्या मृ्त्यूबाबत भाष्य करत होते. त्यामुळे सालियन कुटुंबीयांची बदनामी झाल्याबाबत त्यांनी दोन वेळा मालवणी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. १९ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यासर्व मालवणी पोलिसांनी नारायण राणेंना समन्स बजावले आहेत. ३ मार्च रोजी अर्थात गुरुवारी नारायण राणेंना मालवणी पोलिसांसमोर हजर राहाण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलं आहे.