गौरी आवळे / सातारा :
चल पुढे, कर संघर्ष, अन्यायाविरूद्ध आवाज उठव, नको घाबरू मी आहे सोबत…मी आहे सोबत… मी ही ‘स्त्री’ तु ही ‘स्त्री’ ही आपली खरी ओळख…! असा विश्वास महिलांच्या मनामनात निर्माण करणाऱ्या सुनिशा शहा नारी शक्तीचा बुलंद आवाज बनल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक कार्य ते राजकारण असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
मुळच्या सातारच्या सुनिशा शहा यांनी डबल ग्रॅज्युएशन पूर्ण करत बीएससी, पोस्ट ग्रॅज्युएशन इन मेडिकल लॅबरोटरी टेक्नीशीयन शिक्षण घेतले. प्रतापगंज पेठेत उत्कर्ष लॅबरोटरी नावाने लॅब सुरू केली. या माध्यमातून 21 वर्ष त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांना रोजगार मिळावे या हेतूने त्यांनी लॅबमध्ये सर्व महिला टेक्नीशीयन कामाला ठेवल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्राला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी ‘नारीशक्ती’ फौंडेशनची स्थापना केली. महिलावर अन्याय झाल्यास त्यांना मदतीसाठी एका भक्कम साथ देणारी मैत्रीण बनून त्या काम करत आहेत. अत्याचार झालेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या गावात बोलवले जाते तिथे जातात. प्रकरण काय आहे यांची माहिती घेवून तपास अधिकाऱ्यांना भेटतात. पीडितेला शासकीय मनोर्धेर्य योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी त्या मार्गदर्शन करतात. त्यांच्या या कार्यामुळे दक्षता समितीच्या सातारा शहर सदस्या पदी त्यांची निवड झालेली आहे. महिलांना घरी बसून रोजगार उपलब्ध करून देतात. त्यांच्या कलागुणांना वाव देतात. दरवर्षी त्या प्रदर्शन भरवतात. या प्रदर्शनात एकाच रजिस्टेशन फि घेवून महिलांना वर्षभर स्टॉल उपलब्ध करून देतात. कोरोना काळात त्यांनी महिलांना पर्स शिकवण्याचे काम दिले. यासाठी स्वखर्चाने सर्व भांडवल घालून कच्चा माल उपलब्ध करून दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तरी त्यांनी रस्त्यावर उतरून काही टेस्ट मोफत करून दिल्या. काहीच्या घरी जावून कमी पैशात टेस्ट करून दिल्या. ज्यांचा वाढदिवस आहे. त्या महिला-पुरूष यांना लॅबमध्ये हिमोग्लोबिन, शुगर तपासणी मोफत करून देतात. त्यांचे आजोबा स्व. जी जी कदम हे सातारा-जावली विधानसभा मतदार संघाचे 20 वर्ष आमदार होते. त्यांची आजी श्रीमती. आशालता गेणोजी कदम महिला बाल कल्याण सभापती होत्या. मामा अमित दादा गेणोजी कदम शिक्षण सभापती होते. सुनिशा शहा यांचे संगोपन आजोबा जी जी कदम यांच्या छत्रछायेत झाले. यामुळे आजोबांकडून राजकारण आणि समाजकार्याचा वारसा त्यांना मिळाला. भारतीय जनता पक्षात त्यांनी महिला मोर्चा सरचिटणीस, महिला मोर्चा विधानसभा प्रमुख अशी पदे यशस्वीपणे भुषवली आहेत. आता त्या विद्यमान जिल्हा कार्यकारणी सदस्य आहेत. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्यासोबत त्या महाराष्ट्रात काम करत आहेत. नगर पालिकेची प्रभाग 6 मधून त्यांनी निवडणूक लढली. त्यांचे पती निलेश शहा यांचे प्रतापगंज पेठेत कॉर्नर रेस्टारंट आहेत. तसेच ते भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना सामाजिक, राजकारणात पतीकडून मोलाची साथ मिळत आहे.
सक्षमीकरण, सबलीकरण हे नुसते भाषणात
ऐकण्यासाठी राहिलेले नाही. एक महिला म्हणून आपण त्यात सहभागी झाले पाहिजे. महिलांना घरातूनच विरोध होतो हे मी पहिले आहे. आपण महिला नवदुर्गा, रणरागिनीचे रूप आहोत. सर्व महिलांमध्ये खूप ताकद आहे. की आपण कुठल्याही संकटाचा समाना करू शकतो. अडचणीच्या काळात प्रत्येक महिलेने महिलेच्या मदतीला उभे राहिले पाहिजे. तरच समाज उभा राहिल.
-सुनिशा शहा,
जिल्हा कार्यकारणी सदस्य, भाजपा