- रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी नाही
ऑनलाइन टीम / नालासोपारा :
रायगड जिल्ह्यातील महाड मधील इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच नालासोपाऱ्यातही 11 वर्ष जुनी असलेली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास चार मजली असलेली इमारत पडल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल तसेच तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरात ही इमारत असून ‘साफल्य’ असे या इमारतीचे नाव आहे. ही इमारत 2009 मध्ये अनधिकृतरित्या बांधण्यात आली होती. या इमारतीमध्ये एकूण 20 फ्लॅट होते. इमारत धोकादायक झाल्याने राहिवाशांना महापालिकेने बाहेर पडण्याची नोटीस दिली होती. त्यामुळे 15 कुटुंबे अगोदरच दुसरीकडे राहण्यासाठी गेली होती. तर 5 कुटुंबे याच इमारतीत आपला जीव मुठीत घेऊन राहत होती.
इमारतीच्या काही भिंतींची माती काल (मंगळवार 1 सप्टेंबर) रात्री 10 वाजल्यापासूनच पडत होती. त्यामुळे रहिवाशी घाबरलेल्या अवस्थेत होते. रात्री 12 च्या सुमारास सर्व रहिवासी इमारतीच्या खाली आले. मध्यरात्री एक वाजता सर्वांच्या डोळ्यासमोर अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही चार मजली इमारत कोसळली आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.