वार्ताहर /किणये :
नावगे येथील लक्ष्मी मंदिरात चोरी झाली आहे. चोरटय़ांनी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र, मणी अशा सव्वा दोन तोळ्याचे सोने लांबविले आहे. सदर चोरीची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.
ही चोरी बुधवारी रात्री झाली असावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लक्ष्मी मंदिरात चोरी झाल्योन गावात एकच खळबळ उडाली आहे. चोरटय़ांनी आता मंदिरे लक्ष्य केल्यामुळे ग्रामीण भागातील जनता भयभीत झाली आहे. मंदिराचे गेट तोडून चोरटय़ांनी मंदिरात प्रवेश केला त्यांनतर गाभाऱयाच्या दरवाजाची कडी तोडून लक्ष्मी देवीच्या गळ्यातील सोन्याची चोरी केली. गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान पुजारी मंदिरात पूजा करण्यासाठी आले असता सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
गावातील पंच सातेरी कामती, मारुती हुरकाडली, मारुती हुंबरवाडी, परशराम नाईक, संजय हुंबरवाडी आदींनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे हवालदार चन्नाप्पा हुंचीनाळ, एस. एम. सिंदगी व नारायण आदींनी घटनास्थळीची पाहणी करून पुढील तपास करीत आहेत.