नावात काहीच्या काही ऊर्फ कै च्या कै असू शकते. कॉमनवेल्थ हा शब्द उच्चारला की आपण राष्ट्रकुलातील देशांचे स्मरण करू. पण कॉमनवेल्थ नावाची एक विमा कंपनी होती. 1956 साली विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा ती एल. आय.सी.मध्ये विलीन झाली. पुण्यात या कंपनीची टोलेजंग आणि देखणी दगडी इमारत आहे. समोर छोटेसे आवार आणि दगडी कुंपण आहे. आम्ही लहान असताना कॉमनवेल्थ हे नाव आबालवृद्धांमध्ये वेगळय़ा कारणासाठी सुविख्यात होते. लहान मुले इमारतीच्या आवारात खेळायची. आजी-आजोबा लोक पायऱयांवर बसून हवा खायचे. ऐंशीच्या दशकात इथे एक अण्णा कॅण्टीन देखील चालवायचा. काळाच्या ओघात सगळे लुप्त झाले. इमारत अजूनही दिमाखात उभी आहे. पण नवीन सुरक्षाव्यवस्था लागू झाल्याने संध्याकाळी नागरिक इमारतीच्या आवारात जाऊ शकत नाहीत. इमारतीचे ते सायंकालीन कट्टारूप हरवले. तीच गोष्ट युनियन बँकेची. बँक म्हटल्यावर तिथे पैसे ठेवायचे किंवा काढायचे इतकेच आपण जाणतो. पण ऐंशीच्या दशकात पुण्याच्या सोन्या मारुती चौकात युनियन बँक म्हटल्यावर आसपासच्या जाणकार खवय्यांना तिथल्या कॅण्टीनची आधी आठवण येई. या चौकातली पहाट कॅण्टीनमधले गुजराती शैलीदार पोहे, गोल भजी, ताजा जाळीदार लुसलुशीत ढोकळा आणि दालचिनीचा जिव्हाकर्षक सुगंध ल्यालेल्या कडक स्पेशल चहाने साजरी होई. इथला सामोसा दिसायला पंजाबी सामोशासारखा असला तरी त्याचे अंतरंग गोडगुज्जू होते. किंचित आंबटगोड-तिखट गूढ चवीचा हा सामोसा दिवसभर त्याच्या चटणी-शेव आदि अभिसारासह उपलब्ध असे. इथल्या देखण्या साबुदाणा खिचडीसाठी नास्तिक माणूसदेखील कुठल्याही वारी कुठल्याही देवासाठी उपवास करायला राजी झाला असता. नेमका भिजवलेला एकेक मऊसूत साबुदाणा, त्यात शेंगदाण्यांचा जाडाभरडा कूट, माफक हिरवी मिरची आणि वरून बटाटय़ाचा कडक चिवडा, शेजारी करवलीसारखी काकडीची कोशिंबीर. आहा! कॉलेजमध्ये असताना आम्ही जागरणाची सांगता इथल्या चहा आणि पोह्यांनी करीत असू. उफाडय़ाचा बांधा असलेल्या इथल्या इमारतीला मालक ‘तोडय़ाची जिलबी’ म्हणत.
काही दिवसांपूर्वी इथे फिरत असताना अचानक या खाद्यभूमीचे स्मरण झाले. पत्ता शोधत गेलो. फार प्रयास न होता पत्ता सापडला. बोळात जावे की जाऊ नये… कॅण्टीन दुरवस्थेत असेल तर मनाला यातना होतील का? मनाचा हिय्या करून आत गेलो. आणि अहो आश्चर्यम्… सारे काही तस्सेच होते. फक्त आमची वये उरली नव्हती. पण तरी जिव्हेचे थोडेसे लाड पुरवले आणि ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणत तृप्तपणे परतलो.