करमणे, नावेलीवर शोककळा : चौघा गंभीर जखमांवर उपचार
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात सध्या रस्ता अपघातात मृत्यू येण्याच्या घटना चालूच आहेत. मंगळवारी पहाटे नावेली येथे रस्ता अपघातात आणखी दोघांना मृत्यू आला तर इतर तिघेजण गंभीर असून इस्पितळात उपचार घेत आहेत. करमणे तसेच नावेली गावात सध्या एकच शोककळा पसरलेली आहे.
नावेली येथे मंगळवारी मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे ज्योकी रॉड्रिग्स (72) आणि त्यांची पत्नी लीना रॉड्रिग्स (74) अशी आहेत.
याच अपघातात आणखी चौघेजण जखमी झाले असून जेसिका रॉड्रिग्स (52) (मयत ज्योकी यांची मुलगी), रॉबिन सांतान नोरोन्हा (55) हे जावई, नात वेनेसिया नोरोन्हा (16), वाहन चालक बेनी मार्टीन पेरेरा (54) अशी आहेत.
सात वर्षांनंतर गोव्यात परतत होते रॉड्रिग्ज जोडपे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योकी रॉड्रिग्स व त्यांची पत्नी लीना हे जोडपे मूळ सासष्टीतील करमणे येथील. गेली 7 वर्षे ही मंडळी दुबईला वास्तव्याला होती. मंगळवारी हे जोडपे मायदेशी परतले होते. पहाटे त्यांचे विमान दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरले. त्यांना आणण्यासाठी चिंचोणे येथील कारचालक बेनी पेरेरा विमानतळावर पोहोचला होता. सात वर्षांनी परतलेल्या ज्योकी रॉड्रिग्स आणि त्यांची पत्नी लीना रॉड्रिग्स यांना घेऊन करमणे येथे जाताना हा अपघात घडला.
कारने रस्त्याच्या दुभाजकाला दिली धडक
कारचालक बेनी पेरेला त्या दिवशी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास विमानतळावर जाण्यासाठी झोपेतून उठला होता. त्यामुळे त्याची झोप पूर्ण झाली नव्हती. नावेली गावाजवळ पोहोचताच त्याला डोळा लागला आणि इतक्यात काळाने डाव साधला. भरवेगात असलेली ही कार रस्त्याच्या दुभाजकावर आढळल्याने हा भीषण अपघात झाला.
पत्नीचा जागीच, तर पतीचा इस्पितळात मृत्यू
पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सोपस्कार पूर्ण करण्यात आले. जखमींना इस्पितळात नेण्यात आले. ज्योकी रॉड्रिग्स यांना उपचार चालू असताना मृत्यू आला तर त्यांच्या पत्नीला जागीच मृत्यू आला. त्यांना ‘मृतावस्थेत आणले’ अशी डय़ुटीवर असलेल्या डॉक्टरांनी नोंद केली आहे.
इतर चार जखमीवर उपचार चालू आहेत. उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.
एकाच आठवडय़ात 6 मृत्यू
झुआरी पुलावरुन कार नदीत पडल्याने झालेल्या अपघातात लोटली येथील चारजणांना मृत्यू आला होता. त्यापाठोपाठ आता नावेली अपघातात दोघांना मृत्यू आला तर इतरांवर उपचार चालू आहेत. दक्षिण गोव्यात एकाच आठवडय़ात सहा जणांना मृत्यू आला.
वाहनचालक बेनी पेरेरा यांच्याविरुद्ध मडगाव पोलीस या दोघांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.