फिरोज मुलाणी/ पुणे
महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम रोमहर्षक लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने निर्णायक क्षणी पटाची पकड घेऊन मिळवलेल्या दोन गुणामुळे त्याने लातूरच्या शैलेश शेळकेला तीन विरुद्ध दोन गुणांनी नमवीत. महाराष्ट्र केसरी किताबाची गदेला गवसणी घातली. नाशिकला पहिल्यांदा ही मानाची गदा मिळाल्याने नाशिकच्या कुस्ती शौकिनांनी जल्लोष केला. तर काका पवारांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात मंगळवारी मानाची गदा विराजमान झाली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा यांच्या संयुक्त विद्यमाने 63 व्या महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार, यांच्या हस्ते बरोबर वाजता खा. श्रीनिवास पाटील, खा. श्रीरंग बारणे, माजी खा. अशोकराव मोहोळ, आ. भारत भालके, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या उपस्थितीत सहा वाजून पस्तीस मिनीटानी लावण्यात आली.
लाल जर्सी परिधान केलेला 103 किलो वजनाचा हर्षवर्धन उंचीनेही भारी वाटत होता तर निळी जर्सी घातलेला 98 किलोचा शैलेश उंचीने कमी असला तरी मजबूत बांध्याचा होता. तो सेनादलात सेवेत आहे. सलामीला दोघांनी एकमेकांची ताकद आजमावली. कुस्तीत सक्रीय होण्यासाठी पंचानी हर्षदला ताकीद देऊनही त्यामध्ये सुधारणा होत नसल्याने नकारात्मक कुस्ती केल्याबद्दल शैलेशला एक गुण देण्यात आला. गुणांची आघाडी कमी करण्यासाठी सदगीरने आक्रमक होण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि पहिल्या फेरीत गुणांची आघाडी घेऊन शैलेशने दबाव वाढवला मात्र दुस्रया फेरीत दबाव झुगारून आक्रमक लढणे पसंत केले परंतु शैलेशने बचावात्मक धोरण अवलंबल्याने पंचानी नकारात्मक कुस्तीबद्दल सदगीरला एक गुण दिल्याने त्याने बरोबरी साधली. कुस्तीशौकीनांची त्यामुळे शेवटच्या दोन मिनिटात काय होणार यामुळे कुस्तीशौकीनांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दोघानाही ग्रीकोरोमन कुस्तीचे डावपेच माहीत असल्याने एकमेकावर टाकलेले डाव निष्प्रभ ठरत होते. परंतु अतिम चोवीस सेकंदात सदगीरने मोका साधत एकेरी पटाची पकड घेऊन ताबा मिळवला आणि दोन गुण घेऊन गुणांची बढत मिळवली. याच स्थितीत भारंदाज मारण्याचा प्रयत्न शैलेशच्या भक्कम बचावामुळे अपयशी ठरला असला तरी निर्धारित वेळेत तीन विरुद्ध दोन गुणानी ही प्रतिष्ठेची लढत खिशात घालून नाशिक जिह्याला पहिल्यांदा मानाची गदा मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला. हर्षवर्धन हा मूळचा हळकोंबणे ता अकोले जिल्हा नाशिक येथील आहे. तो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जूनवीर काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. आज मानाची गदा मिळवून गुरु काका पवारांचे स्वप्न देखील पुर्ण केले. तर मोठा लढवैय्या शैलशने पहिल्या फेरीत आघाडी मिळूनही कालच्या प्रमाणे आक्रमक खेळ न केल्याने दुस्रया फेरीत तो पिछाडीवर गेला. त्यामुळे अतिम क्षणार्धात निर्णायक गुण गमवावे लागल्याने त्यांचे महाराष्ट्र केसरी किताबाचे स्वप्न भंगले. तो देखील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात काका पवारांच्या कडेच सराव करतो आहे.
97 किलोच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या सुरज मुलाणीची सातारच्या विकास सुळ पुढे डाळ शिजली नाही. मोठय़ा फरकाने ही लढत जिंकून सुवर्णपदक खिशात टाकले. सुरजला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. 97 किलो मातीगटात सौरभ सोनटक्के मुंबई उपनगर विरुद्ध विशाल बनकर सोलापूर याने चितपटीने विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले.
दरम्यान सकाळच्या सत्रात माती गट 65 किलो, 61 किलो गादी गट, 74 किलो गादी गट, 65 किलो गादी गट, 92 किलो गादी गट, महाराष्ट्र केसरी गादी गट यांचे अंतिम सामने रंगले.
61 किलो गादी गट- सुवर्ण- विजय पाटील, कोल्हापूर (4-2), रौप्य – सागर बरडे, नाशिक जिल्हा, कांस्य- अनुदान चव्हाण, पुणे शहर, कांस्य- सौरभ पाटील, कोल्हापूर शहर
74 किलो गादी गटा सुवर्ण- कुमार शेलार, कोल्हापूर, रौप्य- स्वप्निल काशीद, सोलापूर शहर, कांस्य- अमित सुळ, सोलापूर, कांस्य- राकेश तांबूटकर, कोल्हापूर.
65 किलो गादी गटा सुवर्ण – अक्षय हिरगुड, कोल्हापूर, रौप्य – देवानंद पवार, लातूर, कांस्य – भालचंद्र कुंभार, पुणे शहर, कांस्य – भाऊराव सदगिर, नाशिक.
92 किलो गादी गट ा सुवर्ण – पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर, रौप्य – प्रसाद सस्ते, पिंपरी चिंचवड, कांस्य – भैरव माने, सोलापूर, कांस्य – सागर मोहोळ, पुणे शहर.
65 किलो गादी गटा सुवर्ण – सुरज कोकाटे, कोल्हापूर (10-0), रौप्य – सोपान माळी, जळगाव, कांस्य – हदयनाथ पाचवटे, कोलहपूर विरुद्ध लखण म्हात्रे, कल्याण (3-1).
महाराष्ट्र केसरी गादी गट : सुवर्ण – हर्षवर्धन सदगिर, नाशिक जिल्हा, रौप्य – अभिजित कटके, पुणे शहर, कांस्य – संतोष गायकवाड, अहमदनगर , कांस्य – योगेश पवार, सोलापूर शहर
तब्बल दहा वर्षे गदेची प्रतिक्षा
अर्जूनवीर काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात जागतिक कास्यपदक, राष्ट्रकुल सुवर्णपदक, एशियन चँम्पियनशिप, याशिवाय कँडेट गटातील आंतरराष्ट्रीय पदक आणि शालेय, वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील पदके तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतील अनेक पदके तालमीला मिळाली असली तरी राज्यातील सर्वोच्च किताबाची महाराष्ट्र केसरीची गदेची उणीव मात्र भासत होती. कारण आतापर्यंत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनेकदा त्यांचे पट्टे किताबाच्या लढतीत अंतिम फेरीत पोहचूनही पराभव पाठ सोडायला तयार नसल्याने गदा हुलकावणी देत होती. आजच्या लढतीत महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरीसह खुल्या गटातील कास्यपदक आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्लांनी पटकावून नवा इतिहास रचला आहे.
संपूर्ण स्पर्धेत आंतरराष्ट्रीय संकुलाचा दबदबा.
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला 22 पदके
राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील 40 मल्ल विविध जिह्याचे प्रतिनिधित्व करीत होते. खुल्या गटातील महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी सह 10 सुवर्णपदके, 7 रौप्यपदके, आणि पाच कास्यपदकासह एकूण 22 पदकाची कमाई करून संपूर्ण स्पर्धेवर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्लांचे वर्चस्व दिसून आले.
चौकट
नाशिकला आतापर्यंत महाराष्ट्र केसरीची गदा मिळालेली नाही. 1995 साली अंतिम फेरीत राजू लोणारीला पराभवाचा सामना करावा लागल्याने उपमहाराष्ट्र केसरी पदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर आज हर्षवर्धन सदगीर यांने अंतिम फेरीत धडक मारुन जिल्यातील कुस्तीशौकीनांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तो यशस्वी ठरला.
चौकट
खिलाडूवृत्तीचे दर्शन
अंतिम फेरीत परस्परांशी भिडणारे आणि त्वेशाने लढणाया हर्षवर्धन आणि शैलेशने अंतिम कुस्ती संपताच खिलाडूव्रुत्तीचे दर्शन घडवले महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यावर हर्षदने शैलेशला खांद्यावर घेऊन मैदानात फेरी मारली कुस्ती शौकिनांनी टाळ्यांच्या गजरात त्याच्या खिलाडूव्रुत्तीचे कौतुक केले.
चौकट
महाराष्ट्र केसरी किताबाच्या आजच्या लढतीत तब्बल 50 वर्षानी लातूरच्या सुपुत्राने धडक मारली आहे. 1969 साली रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांनी हा बहुमान लातूरला मिळवून दिला होता. गतवर्षीचा ग्रीकोरोमन विजेता आंतरराष्ट्रीय मल्ल शैलेश शेळकेने आज अंतिम फेरीत गाठल्याने त्याच्या कामगिरीकडे जिल्हावासियांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र तो त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तो अपयशी ठरल्याने लातूरला आज गदेने हुलकावणी दिली.