पुणे / प्रतिनिधी :
प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळके याचा 3 विरूद्ध 2 गुणांनी पराभव करीत मंगळवारी मैदान मारले.
बालेवाडी येथील क्रीडासंकुलात हा सामना रंगला. अर्जुनवीर काका पवार यांचे शिष्य असलेला नाशिकचा हर्षवर्धन सदगीर लाल काश्च्युमध्ये, तर निळय़ा काश्च्युममध्ये लातूरचा शैलेश शेळके मैदानात उतरला. दोघांनी प्रथम एकमेकांचा अंदाज दिला. त्यानंतर दोघे परस्परांना भिडले. पंचांनी हर्षवर्धन यास कुस्तीसाठी समज दिली. मात्र, निर्धारित वेळेत गुण वसूल न करता आल्याने शैलेश यास एक गुण देण्यात आला. त्यानंतर शैलेश यासही समज दिली गेली. पुन्हा खडाखडी झाली. मात्र, कुस्ती संथ पद्धतीने सुरू राहिली. निर्धारित वेळेत गुण वसूल न केल्याने हर्षवर्धन याच्या खात्यावरही एक गुण जमा झाला. त्यामुळे दोघे मल्ल 1-1 बरोबरीत आले.
त्यानंतर दोघेही पुन्हा भिडले. शैलेशने आक्रमक होत एक गुण घेतला. त्याला हर्षवर्धन जोरदार प्रत्युत्तर देत दोन गुण वसूल केले. अशा प्रकारे निर्धारित वेळेत 3 विरूद्ध 2 ने त्याने कुस्ती जिंकली. कुस्तीचा निकाल लागल्यानंतर हर्षवर्धनचा सहकारी शैलेश याने त्याला खांद्यावर घेऊन दोस्तीचे अनोखे दर्शन घडविले. विजेत्यांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.