नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी हल्ल्यात हौतात्म्य : अन्य 9 जण जखमी
रायपूर : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील सुकमा जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी कोब्रा 206 बटालियनवर आयईडीने केलेल्या हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांना वीरमरण आले आहे. तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) अन्य 9 जवान जखमी झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री ताडमेटला परिसरातल्या बुर्कापालपासून 6 किलोमीटर अंतरावर सीआरपीएफचे जवान नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी हा आयईडी स्फोट घडवून आणल्याची माहिती सुरक्षा प्रवक्त्याने रविवारी दिली.
सुरक्षा दलाचे जवान शनिवारी ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. शोधमोहीम सुरू असताना रात्री उशिरा काही जवान नक्षलवाद्यांनी तयार केलेल्या स्पाईक होल्समध्ये अडकून जखमी झाले. त्यानंतर काही जवान आयईडी स्फोटात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुकमाचे पोलीस अधीक्षक के. एल. ध्रुव यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी रायपूरला आणण्यात आले आहे. तर असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला.
नितीन भालेराव हे मूळचे नाशिकचे आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी भालेराव यांच्या कंपनी कमांडरशी संवाद साधला आहे. त्यांचे पार्थिव रायपूरहून विमानाने मुंबईला आणले जाणार आहे. तेथून ते नाशिकला आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील, त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामात केला जाईल, अशी माहिती देण्यात आली. भालेराव यांच्या निधनामुळे नाशिक जिल्हय़ासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.