ऑनलाईन टीम / नाशिक :
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
झाकीर हुसेन रुग्णालयात आज दुपारी 12.30 वाजता ऑक्सिजनच्या टँकरमधून ऑक्सिजन टाकीत भरण्यात येत होता. त्यावेळी ऑक्सिजनची गळती होऊन व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 23 रुग्णांपैकी 22 रुग्ण दगावले. तर काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.
या रुग्णालयात एकूण 150 रुग्ण होते. त्यापैकी 23 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर इतर रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ऑक्सिजन गळतीमुळे घडलेल्या दुर्घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. ही घटना नेमकी कशी घडली, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.