आठवडय़ात 3 दिवस मिळणार सेवा :1,999 रुपये प्राथमिक दर : 12 व्या शहराला थेट विमानसेवा
प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक भूमी म्हणून ओळख असणाऱया नाशिक शहराला सोमवारपासून बेळगावमधून विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. संजय घोडावत ग्रुपचे स्टार एअर या मार्गावर विमानसेवा सुरू करीत आहे. आठवडय़ातून 3 दिवस ही विमानसेवा देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकपासून जवळ असणाऱया त्र्यंबकेश्वर व शिर्डी साई भक्तांना या सेवेचा फायदा होणार आहे.
उडान-3 अंतर्गत सर्वसामान्य प्रवाशांना विमान प्रवास करता यावा, यासाठी परवडणाऱया दरात तिकीट दर आकारण्यात येत आहे. स्टार एअरला मंजूर झालेल्या मार्गांपैकी नाशिक मार्गावर सोमवारपासून विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. यासाठी कंपनीने 1 हजार 999 रुपये प्राथमिक तिकीट दर निश्चित केला आहे. अवघ्या तासाभरात प्रवाशांना नाशिकला पोहचता येणार आहे.
यापूर्वी बेळगावमधून 11 शहरांना थेट विमानसेवेद्वारे जोडण्यात आले होते. आता नाशिकमुळे 12 व्या शहराला जोडण्यात येणार आहे. स्टार एअरने इंदूर, मुंबई, अहमदाबाद, बेंगळूर, अजमेर, सुरत या शहरांना बेळगावमधून विमानसेवेद्वारे जोडले गेले आहे. ग़् बेळगावमधून सर्वाधिक शहरांना स्टार एअर सेवा देत आहे. त्यांची दोन एअरक्राफ्ट बेळगाव विमानतळावर दररोज नाईट पार्किंगसाठी असतात.
अशी असणार विमानसेवा
सोमवार, शुक्रवार व रविवार असे तीन दिवस विमानसेवा देण्यात आली आहे. दुपारी 4.40 वा. बेळगावहून निघालेले विमान 5.40 वा. नाशिकला पोहचणार आहे. सायंकाळी 6.15 वा. नाशिक येथून निघालेले विमान 7.15 वा. बेळगावला पोहचणार आहे.