पुणे,औरंगाबाद / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे, ही घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
नाशिक येथे 26 ते 28 मार्च या कालावधीत 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. कोरोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असे महामंडळाने ठरविले होते. पण, नोव्हेंबर 2020 च्या मध्यापासून कोरोना संक्रमण कमी झाले. डिसेंबरमध्ये ते आटोक्मयात आले आणि महाराष्ट्राने कोरोनावर मात केली, असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केले होते, असे मंडळाने म्हटले आहे.
संमेलनाची जोरदार तयारी आणि निधी संकलन सुरू असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. साहित्य महामंडळाने व नाशिकच्या स्वागत मंडळाने कोरोना कमी होण्याची वाट पाहिली. पण, तो कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. उलट प्रभाव वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अध्यक्ष ठाले यांनी उपाध्याक्षांसह पदाधिकाऱयांशी चर्चा केली. हा निर्णय घेताना नाशिकचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून बैठकीत हा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलन पुढे ढकलले असले, तरीही संमेलनाच्या नियोजन बैठका सुरु राहणार आहेत. त्यात कुठलाही खंड पडणार नाही. संमेलनाच्या कार्यालयात विशेष दक्षता घेण्यात येत आहे.