प्रवासी घटल्याने 31 मे पर्यंत फेरी राहणार बंद
प्रतिनिधी / बेळगाव
देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असल्याने त्याचा फटका सर्वांनाच बसू लागला आहे. नागरिक प्रवास टाळू लागल्याने प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे. प्रवाशांविना विमान फेऱया सुरू ठेवणे कंपन्यांसाठी तोटय़ाचे असल्याने आता काही दिवस विमानफेऱया रद्द केल्या जात आहे. बेळगाव-नाशिक ही विमानफेरी 31 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे. पुणेनंतर नाशिक फेरीही रद्द करण्यात आली आहे.
जानेवारी 2021 पासून स्टार एअरने नाशिक शहराला विमानसेवा सुरू केली होती. उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र व कोकण या परिसरातून पहिल्यांदाच नाशिकला विमानसेवा सुरू करण्यात आल्याने उत्तम प्रतिसाद मिळाला. जानेवारीपासून एप्रिल महिन्यापर्यंत ही फेरी सुरू होती. परंतु एप्रिलअखेर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रवाशांच्या संख्येत घट होऊ लागली.
यापूर्वी अलायन्स एअरने बेळगाव-पुणे ही विमानसेवा रद्द केली. 9 मे पर्यंत ही सेवा बंद राहील, असे बेळगाव विमानतळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले असले तरी पुढे केव्हा सुरू होईल याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. त्यातच आता स्टार एअरने नाशिक फेरी काही दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 मेपासून 31 मेपर्यंत विमानफेरी रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर फेऱया पूर्ववत -राजेशकुमार मौर्य (संचालक-बेळगाव विमानतळ)
कोरोनामुळे प्रवासी संख्येत घट होऊ लागली आहे. त्यामुळे काही फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे व नाशिक या फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर फेऱया पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.