ऑनलाईन टीम / नाशिक :
आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. छातीत दुखत असल्याचे कारण सांगून त्या रुग्णालयात ऍडमिट झाल्या आहेत. दरम्यान, वैशाली यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मंगळवारी (ता. 17) पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर पकडल्या गेल्या आहेत.
याआधी देखील वैशाली वीर-झनकर यांच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीपैकी दोन दिवस त्यांचा मुक्काम रुग्णालयात होता. आता अंतरिम जामीन अर्ज फेटाळून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश मिळताच वैशाली वीर यांच्या छातीत ‘कळ’ आली. त्यामुळे त्या आज (बुधवारी) पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.त्यामुळे त्यांची कारागृहात रवानगी होऊ शकली नाही. या प्रकरणातील दोन संशयित आरोपी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
- काय आहे प्रकरण ?
सरकारने मंजूर केलेल्या दोन शिक्षण संस्थांशी संबंधित शाळांमध्ये 20 अनुदानानुसार नियमत वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढण्यासाठी वैशाली झनकर यांनी 9 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती आठ लाख रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान तक्रारदाराने ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फत ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई केली होती.