राजकीय दबावापोटी प्रकरण मिटविण्यास पोलिसांना यश
प्रतिनिधी /म्हापसा
नववर्षाच्या पूर्व दिवशी नास्नोळा पंचायतीजवळ अल्पवयीन 6-7 जणांच्या अल्पवयीन मुलांचा जमाव तेथे ओल्डमेन करीत असतानाच पंचायतीचे उपसरपंच तथा हंगामी सरपंचाचा ताबा सांभाळणारे सरपंच फ्रेडी फर्नांडिस यांनी रागाच्याभरात 8 वर्षीय अल्पवयीन मुलाला मारहाण करून त्याच्या गळय़ातील सोनसाखळी तोडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकारामुळे गावात वातावरण बरेच तंग झाले. शेवटी पोलिसांनी जीप पाठवून उपसरपंचाना ताब्यात घेऊन म्हापसा पोलीस स्थानकावर आणले. मात्र राजकीयदृष्टय़ा पोलिसांवर दडपण आल्याने हे प्रकरण नोंद न करता उपसरपंच फ्रेडीकडून लेखी लिहून घेऊन सोडण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नास्नोळा पंचायतीजवळ 7 अल्पवयीन मुले ओल्डमेन करीत असताना उपसरपंच फ्रेडी तेथे आले व रागाच्याभरात 8 वर्षीय अल्पवयीन मुलांच्याकानपटीत लावले. यावेळी झटापटीत त्या मुलाची सोनसाखळी तुटली. घटनेची माहिती त्या मुलांनी आपल्या पालकांना दिल्यावर सर्वजण घटनास्थळी आले. वातावरण तंग झाल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी उपसरपंच फ्रेडीना जीपमध्ये घालून म्हापसा पोलिसात आणले. म्हापसा पोलिसांवर आमदार ग्लेन टिकलो व आदी नेत्यांनी दडपण आणल्यावर अखेर हे प्रकरण आपापसात मिटविण्यात आले. विशेष म्हणजे तक्रादारांना पोलिसांनी पत्रकारांच्या बचावापासून पाठीमागील दारातून बाहेर काढले. व येथे काहीच घडले नसल्याचे दाखवून दिले. दरम्यान यापूर्वीही नरकासूरच्यावेळी उपसरपंचांनी याच मुलाला दम दिला होता. अशी माहिती कुटुंबियांनी दिली. यापुढे त्या मुलाच्या वाटेला जायचे नाही असे पोलिसांनी उपसरपंचाकडून लेखी लिहून घेतले आहे.