उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत कैराना येथून समाजवादी पक्षाचे उमेदवार नाहिद हसन यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय कोंडीत सापडलेला समाजवादी पक्ष आता नाहिदची बहिण इकरा हसनला कैराना मतदारसंघात उभे करणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे इकरा स्वतःच्या भावाकरता घरोघरी प्रचार करत आहे. इकरा ही कैरानाचे खासदार राहिलेले दिवंगत मुन्नवर हसन यांची मुलगी आहे. तर दोनवेळा आमदार राहिलेले नाहिद हसन यांची बहिण आहे. 28 वर्षीय इकराने लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे. अलिकडेच ती कैरानामध्ये परतली असून स्वतःच्या भावासाठी प्रचार करत आहे.
लंडनमध्ये सीएएला विरोध
डिसेंबर 2019 मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात लंडन येथील भारतीय दूतावासासमोरील निदर्शनांमध्ये सामील झाल्याने इकरा चर्चेत आली होती. हातात एक फलक घेऊन उभ्या असलेले इकराचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
राजकीय परिवाराशी संबंध
इकराचे कुटुंब दीर्घकाळापासून राजकारणात आहे. तिचे आजोबा अख्तर हसन यांनी बसप अध्यक्षा मायावती यांना लोकसभा निवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत केले होते. इकराचे वडिल मुनव्वर हुसैन हे पश्चिम उत्तरप्रदेशमधील मातब्बर नेते मानले जात होते. डिसेंबर 2008 मध्ये एका रस्ते दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता.
स्थानिक निवडणुकीत सहभाग
इकराची आई तबस्सुम हसन या पती मुनव्वर यांच्या मृत्यूनंतर खासदार झाल्या. त्यानंतर त्यांचे पुत्र नाहिद दोनवेळा कैरानाचे दोनवेळा आमदार राहिले. इकरा 2015 पासून स्थानिक निवडणूक लढवत आहे. नाहिदवर 17 गुन्हे नोंद असून गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत एका प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
हिंदू-मुस्लिमांमध्ये विभागले एकच कुटुंब
इकरा आणि नाहिद हसनचे पणजोबा बुन्दू आणि कैरानामधील विद्यमान भाजप उमेदवार मृगांका सिंह यांचे वडिल हुकुम सिंह हे भाऊ आहेत. 120 वर्षांपूर्वी कैरानामधील प्रभावी जाट कुटुंबाच्या एका हिस्स्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. एकच पुटुंब हिंदू-मुस्लीम असे विभागले गेल्याने दोघांचे राजकारणही दोन ध्रूवीय झाले. नाहिद आणि इकरा यांच्या कुटुंबाला भागातील मुस्लिमांचे प्रतिनिधी मानले जाते. तर मृगांकाचे कृटुंब हिंदूंचे प्रतिनिधित्व करते. मागील काही दशकांपासून हीच दोन्ही कुटुंबं या भागातील राजकारणावर राज्य करत आहेत. मृगांकाचे वडिल चौधरी हुकुम सिंह 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते.