विखुरलेल्या घातक अवशेषांचा श्वानपथकाकडून शोध
प्रतिनिधी/ कराड
कराड तालुक्यातील तांबवे येथे नदीपात्रात मासे पकडायला गेलेल्यांच्या गळाला सोमवारी तीन जिवंत बॉम्ब लागले. हे जिवंत बॉम्ब खडकी येथील बॉम्ब बनवण्याच्या फॅक्टरीत तयार झाल्याचे स्पष्ट झाले असून ते सैन्यदलातच वापरले जातात. त्याम़ुळे दहशतवाद विरोधी पथक व कराड पोलीस यांनी संयुक्तपणे तपासाची दिशा गृहीत करत कराड तालुक्यातील काही गावांसह बॉम्ब सापडलेल्या पिशवीवरील पत्त्यावरून परजिह्यातही चौकशीसत्र सुरू केले आहे. चौकशीत हाती येणारी माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जात आहे.
दरम्यान नदीपात्रात सापडलेले तीनही बॉम्ब निर्जनस्थळी नियमांचे पालन करत निकामी करण्यात आले. एकाचवेळी हे बॉम्ब निकामी करताना मोठा धमाका झाला. निकामी झालेल्या बॉम्बचे अवशेष एकत्र करून त्याचा पंचनामा करण्यात आला. ते अवशेष तपासणीसाठी मंगळवारी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. ज्या ठिकाणी बॉम्ब निकामी केले त्या ठिकाणी मंगळवारी सकाळी श्वानपथकास आले होते. बॉम्बचे फुटलेले अवशेष परिसरात पडलेले हेते. ते घातक असल्याने श्वान पथकाच्या मदतीने ते सर्व अवशेष एकत्र करून जमिनीत खोल खड्डय़ात पुरण्यात आले. त्यानंतर जमिनीचे व्यवस्थिच सपाटीकरण करण्याचे काम हाती घेण्याच आले. दरम्यान दहशतवाद विरोधी पथक व कराड पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी परिसरातील गावात चौकशीसत्र सुरू केले आहे. पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे हे स्वता या तपास प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हा पोलीसप्रमुखांनीही तपास पथकाला काही सुचना दिल्या असून त्यानुसार तपासात अत्यंत गोपनीयता बाळगली जात आहे.
बॉम्बच्या बॅच नंबरवरून तपासाला वेग
कोयना नदीपात्रात सापडलेले तीन अंडाकृती आकाराचे लाल, हिरव्या रंगाचे बॉम्ब होते. त्यावर आयताकृती खाचा होत्या. बॉम्बवर 81A-KF61 असा क्रमांक लिहलेला होता. दरम्यान याप्रकरणी संभाजी महादेव चव्हाण (वय 25 रा. साकुर्डी ता. कराड) याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ‘एटीएस’ पथकाकडून तपासणी
तांबवे येथे बॉम्ब सापडल्यानंतर राज्यभरातील यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. मंगळवारी पुणे एटीएसचे पथक कराडला दाखल झाले. पथकाच्या अधिकारी यांनी पोलीस निरिक्षक भरणे यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर तांबवे कोयना नदी पुलावर भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या घटनेचा स्वतंत्रपणे तपास करत चौकशी सुरू केली आहे. दरम्यान कराड पोलिसांनी खडकी येथील फॅक्टरी, सैन्यदलाशी संपर्क करत तपास सुरू केला आहे.