सेन्सेक्सची 724 अंकांची मजबूती : अमेरिकन निवडणुकीचा प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात देशातील भांडवली बाजारात तेजीचा प्रवास कायम राहण्यास स्थानिक घडामोडीं ऐवजी जागतिक पातळीवरील घटनांचा परिणाम मोठय़ा प्रमाणात राहिला आहे. यामध्ये सर्वात महत्वाची घटना म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होय. याचा प्रभाव भारतीय भांडवली बाजारावर राहिला आहे.
नोव्हेंबरच्या 3 तारखेला अमेरिकेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. दिनांक 4 पासून मत मोजणीस प्रारंभ झाला आहे. यामध्ये रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डोमेक्रेटीक पक्षाकडून ज्यो बायडन हे दोघेजण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु यातून निकालाचा कौल अद्यापही स्पष्ट झालेला नाही. या अनिश्चिततेमुळे बाजारात मोठय़ा प्रमाणात नफा कमाई झाल्याने सेन्सेक्सने 700 अंकांचा टप्पा ओलांडला आहे.
अमेरिकेतील निकालाच्या उत्सुकत्तेमुळे जागतिक बाजारातील संकेत मजबूत राहिल्याने गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 724 अंकांनी झेपावला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तेजीसह बंद झाला आहे.
सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स दिवसअखेर 724.02 अंकांनी वधारुन निर्देशांक 41,340.16 वर स्थिरावला आहे. दुसरीकडे निफ्टीत 211.80 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 12,120.30 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये स्टेट बँकेचे समभाग पाच टक्क्यांनी सर्वाधिक नफ्यात राहिले आहेत. सोबत टाटा स्टील, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि एचसीएल टेक यांचे समभाग तेजीत राहिले होते.
तिमाहीतील नफा कमाईच्या आकडेवारीचा परिणामही बाजारात सकारात्मक राहिला आहे. स्थानिक घटना व जागतिक पातळीवरील बदलाची सांगड घालून गुंतवणुकीचा निर्णय घेण्याकडे वळत असल्यानेच नफा कमाईचा वेग शेअर बाजारात दिसला. आंतरराष्ट्रीय बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग, शांघाय कम्पोजिट, कॉस्पी आणि जपानचा निक्की यांचा निर्देशांक तेजीसह बंद झाला.