स्टँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धा ः झरीनचा ऑलिम्पिक रौप्यजेती बुसेनाझला धक्का
वृत्तसंस्था/ सोफिया (बल्गेरिया)
येथे सुरू असलेल्या 73 व्या स्टँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने 51 किलो वजनगटात तुर्कीची टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणाऱया बुसेनाझ केकीरोग्लूचा उपांत्य फेरीत पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. आणखी एक भारतीय मुष्टियोद्धा नंदिनीने या स्पर्धेत कांस्य पटकाविले.
शुक्रवारी झालेल्या महिलांच्या 51 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत भारताच्या माजी कनिष्ठ विश्व विजेती निखत झरीनने तुर्कीच्या बुसेनाझचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. निखतचा बुसेनाझविरुद्ध हा पहिला विजय आहे. 2019 साली झालेल्या विश्व महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत 51 किलो वजनगटात बुसेनाझने भारताच्या मेरी कॉमचा पराभव केला होता.
या लढतीत झरीनने जबरदस्त ठोशावर तुर्कीच्या बुसेनाझचा पराभव केला. निखत झरीन आता रविवारी सुवर्णपदकासाठी अंतिम लढतीत आव्हान उभे करेल. युरोपमधील स्टँडा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धा ही सर्वात जुनी असून 2019 साली झरीनने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.
शनिवारी महिलांच्या 81 किलोवरील वजन गटात भारताच्या नंदिनीने कांस्यपदक पटकाविले. उपांत्य लढतीत कझाकस्तानच्या लेझात कुनगेबायेव्हाने नंदिनीचा 7-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत 48 किलो वजनगटात भारताच्या नितूने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. नितूने युक्रेनच्या हॅना ओखोताचा पराभव केला. आता नितूचा अंतिम फेरीतील सामना इटलीच्या इरीकाविरुद्ध होणार आहे. भारताने या स्पर्धेत गेल्यावेळी पुरूष विभागात रौप्य आणि कांस्यपदक मिळविले होते. दीपककुमारने रौप्य आणि नवीन बोराने कांस्यपदक पटकाविले होते. सोफियामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 36 देशांचे सुमारे 450 स्पर्धक सहभागी झाले आहेत.