सांगलीतील 20 तर अंकलेतील नऊ क्वारंटाईन : सध्या उपचारातील रूग्ण आठ : तीन पोलीसही क्वारंटाईन
प्रतिनिधी/सांगली
शिराळा तालुक्यातील निगडी येथील 50 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारानंतर 14 दिवसांनी घेण्यात आलेले 24-24 तासानंतरचे दोन्ही अहवाल निगेटीव्ह आल्याने ती महिला कोरोनामुक्त झाली आहे. सध्या तिला शासकीय तंत्रनिकेतन येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर सांगली शहरातील रेव्हन्यू कॉलनी येथील व्यक्तीच्या संपर्कातील 20 जणांना संस्था क्वारंटाईन केले आहे तर जत तालुक्यातील अंकले येथील रूग्णांच्या संपर्कातील नऊ जणांना संस्था क्वारंटाईन केले आहे. या दोन्ही लोकांच्या संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब रविवारी घेण्यात येणार आहेत. दरम्यान सध्या जिल्हय़ात कोरोना उपचार सुरू असणारे आठ रूग्ण आहेत.
शिराळा तालुक्यातील निगडी येथील 23 वर्षीय युवती मुंबईतून आली होती. तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या संपर्कात तीची आई आली होती. त्यामुळे आईलाही कोरोनाची लागण झाली होती. शुक्रवारी ही युवती कोरोनामुक्त झाली तर शनिवारी तिची आई कोरोनामुक्त झाली आहे. या दोघींना आता संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सांगली कनेक्शनमधील हाय रिस्क असणाऱया 20 जणांना संस्था क्वारंटाईन
सांगली येथे मुंबई घाटकोपरहून आलेल्या 50 वर्षीय व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 20 जणांना तातडीने क्रीडा संकुल येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर लो रिस्क असणाऱया 60 जणांना होम क्वारंटाईन केले आहे. हाय रिस्क असणाऱया व्यक्तीचे स्वॅब आता रविवारी घेण्यात येणार आहेत. दरम्यान रेव्हन्यू कॉलनी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे. याठिकाणच्या 1241 जणांचा सर्व्हे महापालिकेकडुन करण्यात आला असून या परिसरात आता मोठयाप्रमाणात औषध फवारणी सुरू केली आहे. तसेच या भागात 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे.
अंकले कनेक्शनमधील नऊ जण क्वारंटाईन
जत तालुक्यात अंकले येथील 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती मुंबई चेंबुर येथे कामाला होती. ती मुंबईतून बेकायदेशीरपणे अंकले येथे आली होती. त्यामुळे तिला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील नऊ जणांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. या नऊ जणांचेही स्वॅब आता रविवारी घेण्यात येणार आहेत.
सांगली कनेक्शनमध्ये तीन पोलीस संस्था क्वारंटाईन
सांगली येथील रेव्हन्यू कॉलनीमध्ये मुंबईहून आलेल्या त्या व्यक्तीच्या घरच्यांनी त्याला घरात घेण्यास विरोध केल्यावर त्यांने हंगामा केला त्यामुळे त्यांच्या भावांने विश्रामबाग पोलीसांना बोलावून घेतले होते. त्यावेळी या व्यक्तीला घेण्यासाठी जे तीन पोलीस आले होते त्यांचा संपर्क सदरच्या कोरोनाबाधित व्यक्तीशी आल्याने त्यांनाही आता संस्था क्वारंटाईन केले आहे. त्यांचाही स्वॅब रविवारी घेतला जाणार आहे.
जिल्हय़ातील कोरोना रूग्णांची संख्या
एकूण कोरोना रूग्ण 37
बरे झालेले 28
उपचारातील रूग्ण 08
कोरोनाने मयत 01