प्रतिनिधी / सांगली
शिराळा तालुक्यातील 23 वर्षीय या युवतींच्या आईचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना बाधितांची संख्या आता एकनी वाढली आहे. या युवतीच्याबरोबर प्रवास करणाऱया भावांचा स्वॅब शनिवारी निगेटीव्ह आला होता तर या युवतीवर इस्लामपूरात उपचार करणारे डॉक्टर आणि त्यांचा स्टॉफ असे सात जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर या युवतीचे कुंटुंबिय पाच जणांपैकी चार जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पण आईचा स्वॅब मात्र पॉझिटीव्ह आला आहे. तिच्यावर आता मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. युवतीचे इतर 14 नातेवाईक शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचाही स्वॅब घेण्यात आले आहेत. अद्यापही या 14 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. दरम्यान या युवतीला आणि तिच्या भावाला मुंबईतून घेवून येणारे शिराळा येथील चारजण तसेच कोरोनाबाधित युवती असे मिळून पाचजणांवर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
युवतीच्या संपर्काती 26 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले
शिराळा तालुक्यातील निगडी येथे मुंबईतून एक युवती आणि तिचा भाऊ 16 एप्रिल रोजी आले. त्यानंतर या युवतीला ताप आल्याने ती इस्लामपूर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल झाली त्यावेळी तिच्यावर या डॉक्टरांनी उपचार केले तसेच तिला औषधेही दिली पण या औषधांने तिची प्रकृती सुधारली नसल्याने आणि ती मुंबईतून आल्याचे असल्या कारणावरून तिची रवानगी इस्लामपूर येथील संस्था क्वारंटाईन मध्ये करण्यात आली त्यावेळी तिचा स्वॅब घेण्यात आला. गुरूवारी स्वॅब घेतल्यावर शुक्रवारी तिचा स्वॅब पॉझिटीव्ह आला. त्यामुळे तातडीने तिच्या कुंटुंबांतील पाच व्यक्ती व तिचा भाऊ आणि तिच्यावर उपचार करणारे इस्लामपूर येथील डॉक्टर आणि त्यांचा स्टॉफ असे एकूण 12 जणांना मिरजेत आणण्यात आले. या 12 जणांचे स्वॅबही घेण्यात आले यातील 11 अहवाल निगेटीव्ह आले तर तर या युवतीच्या आईचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बाधिताची संख्या आता 29 वर पोहचली आहे. यातील 26 रूग्ण बरे झाले आहेत तर एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आता या दोघींच्यावर कोरोना रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शिराळा येथे ठेवण्यात आलेल्या युवतींचे नातेवाईक आणि तिच्या संपर्कात आलेल्या इतर 14 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
कोरोना बाधित युवतीसह अन्य चौघांवर गुन्हा दाखल
देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन असतानाही ही युवती आणि तिचा भाऊ मुंबईतून निगडी येथे कसे आला त्याचा पोलीसांच्याकडून तपास काढला असता. निगडी येथील प्रदीप सदाशिव पाटील यांनी त्यांच्या चुलतीवर मुंबईत कर्करोगावर उपचार करण्यासाठी नेण्यास त्यांनी ऑनलाईन पास काढला होता. हा पास फक्त हा रूग्ण पोहचविण्यासाठी होता. प्रदीप पाटील, गणपती पांडुरंग भालेकर, चालक संतोष साळुखे, हे तिघे हा रूग्ण पोहचविण्यासाठी गेले होते. पण मुंबईतून परत येताना त्यांनी या युवतीला आणि तिच्या भावाला या स्कॉर्पिओ एमएच 10 सीएन 8787 यातून निगडी येथे आणले त्यामुळे या कोरोनाबाधित युवती व तिचा भाऊ आणि या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांना तातडीने शिराळा येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जिल्हय़ाला वेठीस धरणाऱयांवर आता थेट कारवाई
खेराडे वांगी येथे मुंबईतून कोरोनाबाधित रूग्ण आणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाचे भय वाढले आणि या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या 30 जणांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले. हा मृतदेह खेराडे वांगी येथे का आणला याची चौकशीची मागणी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यातच शिराळा निगडी येथे ही युवती आणि तिचा भाऊ मुंबईतून आला ते एका खासगी स्कॉर्पिओमधून त्यामुळे या स्कॉर्पिओचा परवाना घेणाऱया आणि त्यातुन प्रवास करणाऱया सर्वांच्याविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात जिल्हय़ाला वेठीस धरणाऱयांविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.
कामेरी, कासेगावमधील कोरोनाबाधितांच्या कुंटुबांतील लोक क्वारंटाईन
सातारा जिल्हय़ातील कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे काम करणाऱया कामेरी आणि कासेगाव येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कृष्णा हीस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. त्यांना 21 एप्रिल रोजी कराड येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब शनिवारी आल्यावर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. या दोघांच्या संपर्कातील आणि कुंटुंबांतील जवळच्या लोकांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. या दोन्ही गावातही 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आले असून या भागात औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. या गावांतही सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिली.
कोरोना एका नजरेत
जिल्हय़ात एकूण कोरोना बाधित 29
कोरोना बरे झालेले रूग्ण 26
कोरोनाचे उपचार सुरू असणारे 02
कोरोनाने मयत 01