शिये/वार्ताहर
आंबवडे (ता.पन्हाळा ) येथील पॉझिटिव्ह तरूण निगवे दुमाला (ता.करवीर) येथील सलुन दुकानदाराच्या संपर्कात आला आहे. या दुकानदाराचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असल्याने निगवेकरांची धाकधूक वाढली आहे. दक्षता म्हणुन ग्रामपंचायतीने निगवे दुमाला गाव संपूर्ण लॉकडाऊन केले आहे.
आंबवडे येथील त्या तरूणाचे वडील मुंबईहून आले होते.त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.तो तरुण वडीलांच्या संपर्कात आला असल्याने त्याचाही स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता.त्यानंतर २६ जून रोजी तो तरुण व त्याचा मित्र निगवे दुमाला येथील सलुन दुकानात केस, दाढी करून गेले आहेत.तर सलुन दुकानदारांने नवीन घर बांधले आहे. घर पहाण्यासाठी एका मोटारसायकल वरून ते फिरले आहेत. सुमारे दोन ते अडीच तास ते एकमेकांच्या संपर्कात होते. आंबवडेतील तरुणाचा कोरोना रिपोर्ट २८ जून ला पाॅझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तो तरुण सलुन दुकानदारांच्या संपर्कात आल्यामुळे निगवे दुमाला येथे खळबळ उडाली आहे.
सलुन दुकानदारांचा स्वॅब २९ जून रोजी तपासणीसाठी पाठवला आहे.त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे दक्षता म्हणुन ग्रामपंचायतीने गाव पुर्णपणे लॉकडाऊन केले आहे. तसेच ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र भुये यांनी गाव सॅनिटायझर करुन दक्षता घेतली आहे.