अनेक जण क्वारंटाईनमध्ये : आकडा वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
दिल्लीतील निजामुद्दिन परिसरात असणाऱया बांगलावाली मशिदीतील धार्मिक सभेत सहभागी झालेले इंडोनेशिया आणि मलेशियातील 62 नागरिक तसेच नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेतील नागरिकही कर्नाटकात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यापैकी 50 जणांचा शोध घेऊन क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. उर्वरितांचा शोध जारी आहे. आणखी एक धक्कायदक बाब म्हणजे तेथील कार्यक्रमात कर्नाटकातील 342 जण सहभागी झाले होते. त्यातील अनेकजण सध्या क्वारंटाईनमध्ये असून त्यांच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवून देण्यात आले आहे. उर्वरितांनी हेल्पलाईनशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी केले आहे.
विजापूर 10, चित्रदुर्ग 8, गुलबर्गा 19, कारवार 2, मंगळूर 28, रायचूर 7, बेळगाव 10, बेंगळूर 4, बळ्ळारी 12, यादगिर 5, बागलकोट 16 तसेच धारवाडमधील 15 जण धार्मिक सभेत सहभागी झाल्याची माहिती आतापर्यंत उपलब्ध झाली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामधील अनेक जण रेल्वेने परतले आहेत. निजामुद्दिनमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी कोणाकोणाशी संपर्क साधला आहे, किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे.