वार्ताहर/ कुडची/हुक्केरी
मार्चच्या प्रारंभी दिल्लीत निजामुद्दीन भागात झालेल्या ‘तबलिगी जमात’ या कार्यक्रमात देशातील अनेक राज्यातून भाविक सहभागी झाले होते. यातील 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. याची दखल घेत कर्नाटकात दाखल झालेल्या भाविकांची शोध मोहीम घेत खबरदारी घेण्यात येत आहे. बेळगाव जिल्हय़ातही कुडची, चिकोडी, हुक्केरी, संकेश्वर येथील अशा संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. हुक्केरी तालुक्यातून 6, रायबाग तालुक्यातून 14 जण आहेत. तर चिकोडी भागातून जवळपास 21 जण दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी झाल्याचे समजते. तसेच विजापूर परिसरातून 10 जण सहभागी झाल्याचे जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत कुडची येथे बुधवारी भेट देऊन सहभागी 14 जणांना तपासणीसाठी बेळगाव येथे आणण्यात आले आहे. या 14 जणांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. यापैकी रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथील एकजण असल्याचे समजते. सदर 14 जण दिल्लीतील कार्यक्रम आटोपून कुडची येथे 19 मार्च रोजी आले आहेत. याची दखल घेऊन प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.
13 जणांच्या सहभागामुळे कुडचीत घबराट
तबलिगी कार्यक्रमात रायबाग तालुक्यातील कुडची येथून सुमारे 13 आणि रायबाग तालुक्यातून 1 जण सहभागी झाले होते. दरम्यान सदर सर्वजण 18 रोजी आपल्या गाव परतले आहेत. अशांना तपासणीसाठी नेण्यात आले आहे. मात्र ते आणखी कोणाच्या संपर्कात आले आहेत काय?, त्यांचा अहवाल काय येणार? यासह अनेक सवाल उपस्थित होताना भीती पसरली आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हुक्केरी तालुक्यातील 5 जणांचा सहभाग
दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमास हुक्केरी तालुक्यातील 5 जणांनी सहभाग घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून या पाचही जणांची भेट घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली आहे. प्रांताधिकारी अशोक तेली यांनी तहसीलदार कार्यालयात टास्कफोर्सची तात्काळ बैठक घेऊन याप्रकरणाचा गांभीर्याने तपास करा, अशा सूचना दिल्या. दरम्यान याप्रकरणातील व्यक्तींना प्रशासनाने फोन केला असता काही व्यक्तींनी आपण दिल्लीत आहोत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
‘तबलिगी’मधील सहभागी व्यक्तींची संकेश्वरमध्ये चौकशी
संकेश्वर : दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेला तबलिगी कार्यक्रम आटोपून संकेश्वर येथे परतलेल्या एका इसमाला 31 रोजी रात्री येथील आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणीसाठी ताब्यात घेतले. सदर इसमाची वैद्यकीय तपासणी केली असून त्याला होम क्वारंटाईन केले आहे. प्रांताधिकारी अशोक तेली व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ईटी यांनी त्याच्या निवासस्थानी भेट देऊन सुरक्षित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. समुदाय आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्याधिकारी डॉ. दत्तात्रय दोडमनी यांनी, सदर इसमाची प्राथमिक स्वरुपात वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे त्याला होम क्वारंटाईन केले आहे.
चिकोडी भागातील 21 जणांचा सहभाग?
चिकोडी : दिल्ली येथील निजामुद्दीन या भागात तबलिगी जमात कार्यक्रमात चिकोडी भागातील जवळपास 21 जण सहभागी असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली आहे. बेळगाव येथील 11 जणांचा यामध्ये सहभाग असल्याचे समजले होते. पण त्यापाठोपाठ आता चिकोडी शहरासह ग्रामीण भागातील काहींचा सहभाग असल्याचे सूत्रांकडून समजते. चिकोडीतील भाविकही या कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सदर कार्यक्रमात चिकोडीचेही काहीजण गेल्याची चर्चा शहरात सुरू होतीच यामुळे शहरवासियांच्या चिंतेत भर पडली आहे.
निपाणीतून कोणाचाही सहभाग नाही
दिल्लीत निजामुद्दीन परिसरात तबलिगी जमात या इस्लाम धर्मीय संस्थेच्या कार्यक्रमात बेळगाव जिल्हय़ातून अनेक जणांनी सहभाग नोंदविल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र सदर कार्यक्रमात निपाणी सर्कलमधून कोणीही सहभागी झालेले नव्हते, अशी माहिती सीपीआय संतोष सत्यनायक यांनी दिली.
विजापुरातून 10 जणांचा सहभाग
विजापूर : दिल्लीत निजामुद्दीन भागात झालेल्या ‘तबलिगी जमात’ या कार्यक्रमात विजापूर येथील पाच महिला व पाच पुरूष असे एकूण 10 जण सहभागी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, वरील दहा जण 3 मार्च रोजी पश्चिम बंगालहून नवी दिल्लीला निजामुद्दीनला गेले. दि. 4 रोजी त्यांनी तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर ते दि. 10 रोजी विजापूर येथे आले होते. आज पोलिसांनी व प्रशासकीय अधिकाऱयांनी त्या दहा जणांची ओळख पटवून यांच्या रक्ताचे व स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवून दिले. सर्व 10 जणाना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात आलेल्या 23 जणांची तपासणी करून त्यांनाही त्यांच्या घरात निगरानीत ठेवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इंडोनेशिया व मलेशिया देशाचा प्रवास करून आलेल्या तिघांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
बेळगावच्या एकाचा कार्यक्रमात सहभाग
बेळगाव : दिल्ली येथील निजामुद्दीन या भागात तबलिगी जमात या इस्लाम धर्मीय संस्थेच्या कार्यक्रमात येळ्ळूरमधील एक जण सहभागी झाला होता. तो काही दिवसांपूर्वीच येळ्ळूरमध्ये परतला आहे. मात्र, त्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मंगाईनगर येळ्ळूरमधील एक जण असल्याचे उघडकीस आल्यानंतर याची माहिती ग्राम पंचायतीला देण्यात आली. त्यानंतर तातडीने डॉक्टरांना बोलावून त्याला आणि त्याच्या पत्नीला तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.