प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याहस्ते ‘टेलेमेडिसीन’ योजनेचा शुभारंभ बांबोळी येथील गोमेकॉत करण्यात आला. या योजनेचा फायदा गोमंतकीय जनतेला मिळणार असून मोठा दिलासा लाभणार असल्याचे त्यांनी नमूद केले तर हा प्रकल्प साकार करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. गोमेकॉतील ऑडीटोरीयममध्ये आयोजित एका कार्यक्रमात या योजनेचे उद्घाटन झाले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे त्यावेळी उपस्थित होते.
श्री. गडकरी यांनी त्यावेळी बोलताना सांगितले की आरोग्य सेवा सर्वात महत्त्वाची असून ती जनतेला मिळाली पाहिजे. औषधांचा खर्च मोठा असून तो गरीब जनतेला परवडत नाही. शिवाय गावामध्ये आरोग्य सेवा डॉक्टर्स उपलब्ध नसतात. मग गावातील लोकांना डॉक्टरसाठी शहरात जावे लागते. विदर्भातील गडचिरोली जिल्हय़ातून नागपुरला पोहोचण्यासाठी 7 तास लागतात तेव्हा तेथील लोकांना आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी काय करता येईल या विचारातून ‘टेलेमेडिसीन’ योजना साकारली आणि ती आता प्रत्यक्ष गोवा राज्यात अंमलात येत असल्याची माहिती श्री. गडकरी यांनी दिली.
मंत्री गडकरी यांनी गोव्यासाठी केली रु. 2000 कोटीची कामे
डॉ. सावंत यावेळी बोलताना म्हणाले की चौरंगी ग्रुप ऑफ कंपनीतर्फे ही योजना गोव्यात सुरू करण्यात आली असून त्यासाठी राज्य सरकारने एकही पैसा खर्च केलेला नाही. गडकरी यांनी गोव्यासाठी रु. 2000 कोटीची कामे केली असून 15 नोव्हेंबरपर्यंत कोरोनाच्या दुसरा डोसचे 100 टक्के लसीकरण व्हावे म्हणून प्रयत्नशील असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. या योजनेचा फायदा गावातील जनतेला पर्यटकांना होणार असून कसलीही महामारी आली तरी देखील त्याचा आम्ही यशस्वीपणे सामना करू शकू, अशी खात्री डॉ. सावंत यांनी प्रकट केली. मंत्री राणे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाला गोमेकॉतील डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी उपस्थित होते.