ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
मला तुम्हां सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी कोरोनामधून पूर्णपणे बरा झालो आहे, आपल्या सर्वांचे धन्यवाद! असे नितीन गडकरी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी नितीन गडकरी यांनी स्वत: ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नितीन गडकरी स्वत:च विलगीकरणात गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वतः च्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही केले होते.