सूरतमध्ये गुजरात पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था/ सूरत
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना व्हॉट्सऍपद्वारे हत्येची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. नितीश यांना हत्येची धमकी मिळाल्यावर याप्रकरणी पाटणा येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता. ही धमकी गुजरातमधून देण्यात आली होती. धमकी देणाऱया युवकाला गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. या आरोपीला आता पाटणा येथे आणण्याची तयारी केली जात आहे.
सूरत येथील लस्काना भागातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना हत्येची धमकी देणाऱया आरोपीचे नाव अंकित मिश्रा आहे. आरोपीला अटक करण्यासाठी बिहार पोलिसांनी सूरत पोलिसांकडे मदत मागितली होती. यानंतर सूरत पोलिसांनी आरोपीला लस्काना येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीला आता बिहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. सूरतमध्ये कामगार असलेल्या अंकितने गूगल सर्च करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोबाइल क्रमांक मिळविला होता.