भाजपचे 8 तर संजदचे 8 नवे मंत्री
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये अखेर नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या विस्तारांतर्गत भाजपच्या 9 तर संजदच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपचे प्रवक्ते राहिलेल्या शहनवाझ हुसैन यांनाही राज्यात मंत्रिपद मिळाले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे चुलत बंधू नीरज सिंग यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बिहारच्या मंत्रिमंडळात आता मंत्र्यांची संख्या 31 झाली आहे. यापूर्वी भाजपचे 7, संजदचे 4 आणि हम तसेच व्हीआयपीचा एक मंत्री होता.
शाहनवाझ हुसैन यांना उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. याचबरोबर नितीश कुमार पूर्वीप्रमाणेच सामान्य प्रशासन, गृह, मंत्रिमंडळ सचिवालय अशा विभागांचा प्रभार राहिला आहे. तर उपमुख्यमंत्री तारकिशारे प्रसाद यांच्याकडे अर्थ, वाणिज्य, कर आणि नगरविकास तसेच गृहबांधणी विभाग आहेत. उपमुख्यमंत्री रेणुदेवी यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन आणि मागासवर्ग कल्याण विभागाची जबाबदारी आहे.
भाजपची नवी खेळी
बिहारमधील अल्पसंख्याक मतपेढीला भाजप फारसा स्वीकारार्ह वाटत नाही. पण मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अन् राजदच्या या मतपेढीला असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमने भगदाड पाडले होते. अल्पसंख्याकांची मते विखुरली गेल्याने भाजपला नवी संधी दिसून येत आहे. या संधीपोटीने भाजपने शहनवाझ यांना मंत्रिपद देत मुस्लीम समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.