माजी केंद्रीयमंत्री बाबागौडा पाटील, एस. पी. सिदनाळ यांना सभागृहाची श्रद्धांजली
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ झाला असून अलिकडेच निधन झालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना सकाळी विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यानंतर राजकीय, सांस्कृतिक, चित्रपट, साहित्य व इतर क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
माजी मंत्री एम. उदासी, माजी विधानसभा अध्यक्ष कृष्ण, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, माजी केंद्रीयमंत्री बाबागौडा पाटील, माजी खासदार आणि ज्येष्ठ शेतकरी नेते जी. मादेगौडा, माजी मंत्री के. बी. शाणप्पा, माजी खासदार एस. पी. सिदनाळ, राज्यसभेचे माजी सदस्य एम. राजगोपाल, राज्याचे माजी मंत्री प्रा. मुमताज अलीखान, ए. के. अब्दुल सय्यद, विधान परिषदेचे माजी सदस्य आणि साहित्यिक डॉ. सिद्धलिंगय्या, माजी आमदार रेवणसिद्धप्पा कल्लूर, सदाशिवराव भोसले, डॉ. चित्तरंजन कलाकोटी, डॉ. जेकब पी. जे., सय्यद जुल्फिकार हशमी, मनोहर कट्टीमनी, एन. एस. खेड, सुरम रामय्या, राजशेखर सिंधुर, स्वातंत्र्यसैनिक एच. एस. दोरेस्वामी, शब्दकोश तज्ञ प्रा. जी. वेंकटसुब्बय्या, ज्येष्ठ पत्रकार महादेव प्रकाश, यक्षगान अकादमीचे अध्यक्ष प्रा. एम. के. हेगडे, शिक्षणतज्ञ एम. आय. सवदत्ती, पर्यावरणतज्ञ सुंदरलाल बहुगुणा, क्रीडापटू मिल्खा सिंग, अभिनेत्री जयंती, गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, साहित्यिक डॉ. वसंत कुष्टगी, वकील मोहन शांतनगौडर यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले.
शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, मंत्री जे. सी. माधुस्वामी, डॉ. नारायणगौडा, बी. सी. पाटील, आमदार शरत बच्चगौडा व इतरांनी निधन झालेल्या मान्यवरांचे कार्य, त्यांच्याशी आलेला संपर्क याचे स्मरण केले. कोरोनाच्या दुसऱया लाटेत आणि महापुरामध्ये जीव गमवावा लागलेल्यांना देखील विधानसभेत मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.